ENG vs WI : 4 सामन्यांत तिसरं शतक, केसी कार्टीचा झंझावात, इंग्लंडच्या गोलंदांजाची धुलाई

Keacy Carty Century : इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या केसी कार्टी याने जोरदार फटकेबाजी करत शतक झळकावलं. केसीने केलेल्या या खेळीमुळे विंडीजला 300 पार पोहचता आलं. केसीचं हे 4 सामन्यांमधील तिसरं शतक ठरलं.

ENG vs WI : 4 सामन्यांत तिसरं शतक, केसी कार्टीचा झंझावात, इंग्लंडच्या गोलंदांजाची धुलाई
Keacy Carty Century ENG vs WI 2nd Odi
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 01, 2025 | 10:38 PM

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा कार्डीफमधील सोफीया गार्डन्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विंडीजचा फलंदाज केसी कार्टी याने झंझावात कायम ठेवत इंग्लंड विरुद्ध धमाकेदार शतक झळकावलं आहे. कार्टीने इंग्लंड विरुद्ध 103 धावांची खेळी केली. कार्टीचं हे गेल्या 10 दिवसांतील तिसरं शतक ठरलंय. कार्टीने गेल्या आठवड्यात आयर्लंड विरुद्ध सलग 2 सामन्यांमध्ये शतक झळकावलं होतं. कार्टीने केलेल्या या खेळीमुळे विंडीजला 300 पार मजल मारता आली. मात्र विंडीजला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजने 47.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 308 रन्स केल्या. विंडीजसाठी कार्टीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. कार्टीने 105 बॉलमध्ये 98.10 च्या स्ट्राईक रेटने 103 रन्स केल्या. कार्टीने या खेळीत 13 चौकार लगावले. कार्टीचा हा 36 वा एकदिवसीय सामना आहे. कार्टीने 36 सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने 4 शतकांसह 1 हजार 403 धावा केल्या आहेत.

एका ओव्हरमध्ये 4 ‘फोर’

केसी कार्टी याने ब्रायडन कार्सच्या एका ओव्हरमध्ये 4 चौकार लगावले. कार्सने त्याच्या कोट्यातली पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली होती. ब्रायडस कार्स याने सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये विंडीजच्या ज्वेल एंड्रयू याला भोपळाही फोडू दिला नाही. एंड्रयूनंतर कार्टी मैदानात आला. कार्टीने एक एक करुन इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि मैदानातील चारही बाजूला फटकेबाजी केली. कार्टीने दुसऱ्या विकेटसाठी ब्रँडन किंग याच्यासोबत 141 रन्सची पार्टनरशीप केली. ब्रँडन किंग 59 रन्स करुन आऊट झाला. त्यांनतर कार्टीने कॅप्टन शाई होप याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. कार्टी आऊट झाल्याने ही जोडी फुटली.

शाई होपची अर्धशतकी खेळी

विंडींजसाठी केसी कार्टी आणि ब्रँडन किंग या दोघांव्यतिरिक्त कॅप्टन शाई होप याने योगदान दिलं. शाई होपने 66 बॉलमध्ये 78 रन्स केल्या. या तिघांशिवाय विंडीजच्या एकालाही मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडसाठी आदिल रशीद याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर साकिब महमूदने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

आदिल रशीदचा महारेकॉर्ड

दरम्यान आदिल रशीद याने 4 विकेट्स घेण्यासह इतिहास घडवला. आदिल रशीद इंग्लंडसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला. आदिलने यासह दिग्गज ग्रेम स्वान याला मागे टाकलं. ग्रेम स्वान याने 410 विकेट्स घेतल्या होत्या. तर आता आदिल रशीदच्या खात्यात 412 विकेट्सची नोंद झाली आहे.