IPL 2025 दरम्यान टेस्ट टीम जाहीर, 2 वर्षांनंतर या बॉलरची एन्ट्री, आणखी कुणाला संधी?

Test Cricket : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. निवड समितीने 13 सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली आहे. जाणून घ्या.

IPL 2025 दरम्यान टेस्ट टीम जाहीर, 2 वर्षांनंतर या बॉलरची एन्ट्री, आणखी कुणाला संधी?
Shubman Gill and Ben Stockes IND vs ENG Test
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: May 02, 2025 | 7:33 PM

क्रिकेट चाहत्यांचं सध्या आयपीएल 2025 स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलं आहे. प्लेऑफमधील 4 स्थानांसाठी 8 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांचं स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएलचा 18 वा मोसम अखेरच्या टप्प्यात असल्याने क्रिकेट चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेही वेध लागले आहेत. बांगलादेश विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील कसोटी मालिकेची सांगता झाली आहे. त्यानंतर आता काही दिवसांनी पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकमेव 4 दिवसीय कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी झिंबाब्वे इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याने या सामन्यासाठी 13 सदस्यीय संघाची 2 मे रोजी घोषणा केली आहे. त्यानुसार स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील हा सामना 22 ते 25 मे दरम्यान ट्रेंट ब्रिज नॉटिंगघम येथे होणार आहे. टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेआधी इंग्लंडसाठी हा सामना सरावाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे दोघे उपलब्ध नसल्याने इंग्लंडला त्यांची उणीव भासेल. तर दुसर्‍या बाजूला बेन स्टोक्स याचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे.

कुणाला संधी?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सातत्याने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र त्या व्यतिरिक्त नव्या खेळाडूंनाही संधी दिली आहे. तसेच एका गोलंदाजाचं टीममध्ये 2 वर्षांनी कमबॅक झालं आहे. जॉश टंग याचं कमबॅक झालं आहे. टंगने 2 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. टंगने कसोटी कारकीर्दीतील एकूण 2 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत.

2 खेळाडूंना पहिल्यांदाच संधी

निवड समितीने 2 खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये स्थान दिलं आहे. वनडे आणि टी 20I खेळणाऱ्या जॉर्डन कॉक्स याला संधी मिळाली आहे. तसेच वेगवान गोलंदाज सॅम कुक याचीही निवड करण्यात आली आहे. कुकने 88 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 318 विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूंकडे एकमेव सामन्यात चमकदार कामगिरी करुन टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा ठोकण्याची संधी असणार आहे.

कसोटी सामन्यासाठी 13 सदस्यीय इंग्लंड टीम

झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, गस एटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ आणि जॉश टंग.