
इंग्लंड क्रिकेट टीमने एजबेस्टनमधील झालेल्या पराभवाचा हिशोब लॉर्ड्समध्ये भारतावर मात करत चुकता केला. इंग्लंड 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात येणार आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारताला या मैदानात अद्याप एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडची या मैदानातील आकडेवारी ही जबरदस्त आहे. इंग्लंडने या मैदानात गेल्या 6 वर्षांमध्ये एकही सामना गमावलेला नाही. इंग्लंडची ही आकडेवारी भारतासाठी चिंताजनक आहे.
इंग्लंडने मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण 84 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडने या 84 पैकी 33 कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच इंग्लंडने या मैदानात 36 सामने अनिर्णित राखले आहेत. तसेच इंग्लंडला या मैदानात फक्त 15 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडला या मैदानात कोणताच संघ गेल्या 6 वर्षांत पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला या स्टेडियममध्ये पराभूत करणं फार आव्हानात्मक असणार आहे.
एका बाजूला इंग्लंडची या मैदानातील आकडेवारी अप्रतिम आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची आकडेवारी ही चिंताजनक आहे. भारताला या मैदानात आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकदाही विजय मिळवता आलेला नाही. भारताने आतापर्यंत एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडने या 9 पैकी 4 सामन्यांमध्ये भारतावर मात केली आहे. तर भारताने 5 सामने अनिर्णित सोडवले. त्यामुळे भारतासमोर या मैदानात गेल्या अनेक दशकांची प्रतिक्षा संपवण्याचं आव्हान आहे.
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये उभयसंघात झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यातील शेवटच्या सत्रापर्यंत चुरस पाहायला मिळाली होती. भारताने इंग्लंडच्या 193 विजयी धावांचा पाठलाग करताना चिवट झुंज दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी इंग्लंडने भारताला 22 धावांआधी रोखलं. इंग्लंडने भारताला 170 रन्सवर ऑलआऊट केलं. इंग्लंडने या विजयासह भारताला 2021 नंतर लॉर्ड्समध्ये सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखलं आणि मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी मिळवली.
दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज चौथ्या कसोटीत खेळणार असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. बुमराहने या मालिकेतील 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं इंग्लंड दौऱ्याआधी स्पष्ट केलं होतं. बुमराह 3 पैकी 2 सामन्यांमध्ये खेळला आहे. त्यामुळे बुमराह चौथ्या आणि पाचव्यापैकी कोणत्या सामन्यात खेळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र बुमराह चौथा सामना खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. आता बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.