ENG vs IND : दुसऱ्या टेस्टच्या काही तासांआधी या खेळाडूची अचानक एन्ट्री, प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार?

England vs India 2nd Test : इंग्लंड विरुद्ध भारतीय क्रिकेट संघातील दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून होत आहे. त्याआधी मॅचविनर गोलंदाज इंग्लंड संघासह पुन्हा एकदा जोडला गेला आहे. जाणून घ्या.

ENG vs IND : दुसऱ्या टेस्टच्या काही तासांआधी या खेळाडूची अचानक एन्ट्री, प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार?
Jofra Archer Test Cricket
Image Credit source: Lee Smith/PA Images via Getty Images
| Updated on: Jul 01, 2025 | 8:36 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने लीड्समध्ये झालेला पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. इंग्लंडने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या कसोटी मालिकेतील पहिला विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तर आता इंग्लंड टीम सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र या दुसऱ्या सामन्याआधी 24 तासांच्या आतच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

इंग्लंडने 30 जून रोजी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. इंग्लंडने 26 जूनला दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश केला होता. त्यामुळे जोफ्राला प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. जोफ्राला कौटुंबिक कारणामुळे टीमची साथ सोडावी लागली. त्यामुळे जोफ्राचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नाही. मात्र आता काही तासानंतर जोफ्रा इंग्लंड टीमसह जोडला गेला. इतकंच नाही तर जोफ्राने सराव केला. त्यामुळे इंग्लंड दुसऱ्या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार का? याबाबत जाणून घेऊयात.

जोफ्राने इंग्लंड संघासोबत जोडल्या गेल्यानतंर सराव केला. मात्र जोफ्रा दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. जोफ्रा त्याच्या वेगवान आणि स्विंग बॉलिंगसाठी ओळखळा जातो. जोफ्राचा सामना करणं भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक राहिलं आहे. जोफ्रा दुसर्‍या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये नाही. मात्र उर्वरित 3 सामन्यांसाठी जोफ्रा उपलब्ध राहिल्यास तो प्लेइंग ईलेव्हनचा भाग असू शकतो.

जोफ्रा गेल्या जवळपास 4 वर्षांपासून कसोटी सामना खेळलेला नाही. जोफ्राने 2021 साली अखेरचा कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्धच खेळला होता. त्यानंतर आता जोफ्राकडे 2 जुलैपासून होणाऱ्या सामन्यातून कमबॅक करण्याची संधी होती. मात्र जोफ्राची ही संधी कौटुंबिक कारणामुळे हुकली. त्यामुळे जोफ्राची कमबॅकची प्रतिक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे.

टीम इंडियासाठी निर्णायक सामना

दरम्यान भारतीय संघ पहिला सामन्यात दमदार कामगिरी करुनही जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासह इंग्लंडला 2-0 अशी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाला या यश येणार की नाही? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.