ENG vs IND : इंग्लंड-इंडिया वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कॅप्टनचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?

England Women vs India Women : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने इंडिया वूमन विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, कॅप्टनचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?
England vs India Women Odi Series 2025
Image Credit source: @shawma1 x account
| Updated on: Jul 09, 2025 | 4:08 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. भारतीय संघाने 6 जुलैला इंग्लंडवर 300 पेक्षा अधिक धावांच्या ऐतिहासिक फरकाने मात केली आणि मालिकेत बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा सामना हा 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी महिला संघाची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरील एक्स या प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

सोफी एक्लेस्टोनचं कमबॅक

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 16 ते 22 जुलै दरम्यान एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. निवड समितीने या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. स्पिनर सोफी एक्लेस्टोन हीचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. सोफी विंडीज विरूद्धच्या मालिकेत संघात नव्हती.

नॅट सायव्हर ब्रँटचं कमबॅक

तसेच नियमित कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीचंही पुनरागमन झालं आहे. नॅटला दुखापतीमुळे 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं. नॅटच्या नेतृत्वातील पहिल्या 2 टी 20i सामन्यात इंग्लंडला पराभूत व्हावं लागलं.

त्यानंतर नॅट तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचं समोर आलं. त्यानंतर मेडीकल रिपोर्ट्सनुसार नॅट या मालिकेत खेळण्यासाठी सक्षम नसल्याने तिला माघार घ्यावी लागली. त्यामुळे टॅमी ब्यूमोंट टी 20i मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर चौथा सामना हा 9 जुलै रोजी होणार आहे. पाचवा आणि अंतिम सामना हा शनिवारी 12 जुलैला होणार आहे. त्यानंतर 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

3 सामने आणि 1 मालिका, इंग्लंड वूमन्स वनडे टीम जाहीर

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 जुलै, साउथम्पटन.

दुसरा सामना, 19 जुलै, लंडन.

तिसरा सामना, 22 जुलै, रिव्हरसाईड ग्राउंड, चेस्टर ली स्ट्रीट.

वनडे सीरिजसाठी इंग्लड वूमन्स टीम : नॅट सायव्हर ब्रंट, (कर्णधार), एम आर्लॉट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, एम्मा लॅम्ब आणि लिन्सी स्मिथ.