ENGW vs INDW 2nd Odi : मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाही लॉर्ड्समध्ये अपयशी, इंग्लंडचा 8 विकेट्सने विजय

England Women vs India Women 2nd ODI Match Result and Highlights : पहिला सामना गमावल्याने इंग्लंडसाठी दुसरा सामना हा आर या पार असा होता. इंग्लंडने दुसऱ्या सामन्यात भारतावर एकतर्फी मात केली आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

ENGW vs INDW 2nd Odi : मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाही लॉर्ड्समध्ये अपयशी, इंग्लंडचा 8 विकेट्सने विजय
WENG vs WIND 2nd Odi
Image Credit source: @BCCIWomen X Account
| Updated on: Jul 20, 2025 | 12:54 AM

मेन्सनंतर वूमन्स टीम इंडियाही ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिेकट ग्राउंडमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरली आहे. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर 22 धावांनी मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर 19 जुलैला वूमन्स इंग्लंडने टीम इंडियावर दुसऱ्या आणि करो या मरो सामन्यात डीएलएसनुसार 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिकेवर नाव कोरतो याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

पावसामुळे सामना 50 ऐवजी 29 ओव्हरचा करण्यात आला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे भारताला 29 षटकात 8 विकेट्स गमावून 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे इंग्लंडला 116 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. इंग्लंडने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं.

इंग्लंडची बॅटिंग

टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स या सलामी जोडीने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी 54 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर टॅमी 34 धावांवर बाद झाली. एमी आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशीप केली. कॅप्टन नॅट 21 रन्सवर आऊट झाली. भारताने इंग्लंडला 102 धावांवर दुसरा झटका दिला.

त्यानंतर सोफीया डंकले आणि एमी जोन्स या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचलं. एमीने नाबाद आणि सर्वाधिक 46 धावा केल्या. तर सोफीयाने नॉट आऊट 9 रन्स केल्या. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय

त्याआधी पावसामुळे दुपारी तीनऐवजी संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या दोघींचा अपवाद वगळता इतरांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. स्मृतीने सर्वाधिक 46 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा हीने नाबाद 30 धावांचं योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे 29 षटकांमध्ये 8 बाद 143 धावा केल्या.

दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा मंगळवारी 22 जुलैला होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना मालिका विजयाची बरोबरीची संधी आहे. अशात आता टीम इंडिया टी 20i नंतर वनडे सीरिज जिंकत इतिहास घडवणार का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.