
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे T20 विश्वचषक 2024 मध्ये शतक ८ रनने हुकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात रोहितने गोलंदाजांना जोरदार धुतले. सलामीवीर म्हणून फलंदाजीला आलेल्या रोहितने त्याच्या कारकिर्दीतले सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने रोहितला बोल्ड केले. मात्र, आऊट होण्यापूर्वी रोहितने गोलंदाजांवर चांगलेच तुटून पडले होते.
ऑस्ट्रेलिया विरोधात रोहित शर्माने ९२ धावांची खेळी केलीये. रोहितने 41 बॉलमध्ये 7 फोर आणि 8 सिक्स मारले. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील रोहितची ही सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी त्याने 2010 मध्ये ब्रिजटाऊन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 79 धावांची नाबाद खेळी खेळली होती. टी-20 विश्वचषकातील कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही दुसरी सर्वोच्च खेळी आहे. सुरेश रैनाच्या नावावर शतक आहे.
या डावात रोहित शर्माला T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याची संधी देखील होती. ख्रिस गेलने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 47 चेंडूत शतक झळकावले होते. रोहितकडे त्याचा विक्रम मोडण्याची संधी होती. पण वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित शर्माच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत. याआधी तो आयर्लंडविरुद्ध ९७ धावांवर बाद झाला होता.