W,W,W..! टी20 क्रिकेट स्पर्धेत एकाच दिवसात दोन हॅटट्रीक, खटाखट विकेट्सचा पाहा Video

देशांतर्गत सैयद मुश्ताक अली टी20 क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रोज नवे विक्रम रचले जात आहे. बरोड्याने 349 धावा करत मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. दुसरीकडे, एकाच दिवसात दोन हॅटट्रीक नोंदवल्या गेल्या आहेत. भुवनेश्वर कुमार आणि फेलिक्स अलेमाओने हॅटट्रीक घेतली. दोन वेगवेगळ्या सामन्यात हॅटट्रीकची नोंद झाली आहे.

W,W,W..! टी20 क्रिकेट स्पर्धेत एकाच दिवसात दोन हॅटट्रीक, खटाखट विकेट्सचा पाहा Video
Image Credit source: video grab
| Updated on: Dec 05, 2024 | 5:56 PM

सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत गोवा आणि नागालँड हे दोन संघ आमनेसामने आले होते. नागालँडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण गोवा संघाने 20 षटकात 6 गडी गमवून 237 धावा केल्या आणि विजयासाठी 238 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही नागालँडला गाठता आलं नाही. 129 धावांवर नागालँडचा संघ सर्वबाद झाला. नागालँडने संपूर्ण 20 षटकं खेळली हे विशेष.. पण शेवटच्या तीन चेंडूवर हॅटट्रीकच मेजवानी क्रीडा रसिकांना मिळाली. खरं तर नागालँडच्या हातून सामनाा गेलेलाच होता. शेवटचं षटक फेलिक्स अलेमाओच्या हाती सोपवलं होतं. पहिल्या तीन चेंडूवर काहीच विकेट हाती लागल्या नाहीत. पण शेवटच्या तीन चेंडूवर धडाधड विकेट पडल्या आणि हॅटट्रीकची नोंद झाली.

नागालँडकडून एकमेव फलंदाज तग धरून होता. चेतन बिस्ट 63 धावांवर असताना फेलिक्सला त्याची विकेट घेण्यात यश आलं. षटकाच्या चौथ्या चेंडवर त्याने त्याची विकेट काढली. त्यानंतर पाचव्या चेंडूचा सामना करण्यासाठी नागहो चिशी आला त्याला पहिल्या चेंडूवर क्लिन बोल्ड केला. फेलिक्सच्या हॅटट्रीकचा आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू होता. ख्रिविस्टो केन्से समोर फलंदाजीला होता. पण फेलिक्सचं नशिब जोरात होतं. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर त्याचाही त्रिफळा उडवला आणि या स्पर्धेतील दुसऱ्या हॅटट्रीकची नोंद केली.

दुसरीकडे, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांच्यात सामना रंगला होता. उत्तर प्रदेशने 160 धावा विजयासाठी दिल्या होत्या. पण या धावांचा पाठलाग करताना झारखंड संघाला 19.5 षटकात 150 धावांपर्यंत मजल मारता आली. भुवनेश्वर कुमारने यात हॅटट्रीक नोंद केली. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशचा विजय सोपा झाला. 17 व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर त्याने हॅटट्रीक घेतली. रॉबिन मिन्झ, बाल कृष्ण आणि विवेकानंद तिवारी याला बाद केलं.