
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरुत बुधवारी 4 जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरसीबीसह कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि डीएनए या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरसीबी, डीएनए, केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या विजयी जल्लोषाच्या नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सदर प्रकरणात कलम 105, 125 (1)(2), 132, 121/1, 190 आर/डब्ल्यू 3(5) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय, याबाबतची माहिती एएनआय वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत इतिहास घडवला. आरसीबीने 18 व्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावा उरला नाही. मात्र आरसीबीच्या या आनंदाला काही तासांनंतरच गाळबोट लागलं. नक्की काय झालं? सविस्तर जाणून घेऊयात.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंचं बंगळुरुत भव्य सत्कार करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चाहत्यांना आमंत्रित करण्यात आलं. चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री ठेवण्यात आली. त्यामुळे या सत्कार समारंभात मोठ्या प्रमाणात चाहते आले. स्टेडियम खचाखच भरल्यानंतर गेट बंद करण्यात आलं. मात्र त्यानंतरही अनेकांना स्टेडियममध्ये जायचं होतं. त्यामुळे चाहत्यांनी गेटबाहेर आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे पोलिसांना हा जमाव पांगवण्यासाठी नाईलाजाने सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 30 पेक्षा जास्त जखमी झाले. या दुर्घटनेमुळे आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाला गाळबोट लागलं.
आरसीबीच्या अडचणीत वाढ
Bengaluru stampede | FIR filed against RCB, DNA (event manager), KSCA Administrative Committee and others at Cubbon Park Police Station. FIR stated criminal negligence in the stampede incident.
— ANI (@ANI) June 5, 2025
दरम्यान या दुर्घटनेनंतर राज्य सरकार आणि आरसीबी टीमकडून मृतांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देणार असल्याचं म्हटलं. तसेच जखमींवर उपचारही सरकारकडून करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने अधिकृत निवेदन जारी करत मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देणार असल्याचं म्हटलं. तसेच चाहत्यांनाही मदत करता यावी, यासाठी ‘आरसीबी केअर्स’ फंड तयार करणार असल्याची माहिती आरसीबीकडून देण्यात आली.