IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबईतील स्टेडियम जवळ भीषण आग; स्टेडियम परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट

ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. आगीचे लोळ उठल्यानंतर संपूर्ण परिसरात धूरच धूर झाल्याने काळे ढग दाटून आल्यासारखं चित्रं निर्माण झालं आहे. शिवाय धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबईतील स्टेडियम जवळ भीषण आग; स्टेडियम परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट
भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी दुबईतील स्टेडियम जवळ भीषण आग; स्टेडियम परिसरात काळेकुट्ट धुराचे लोट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 7:06 PM

शारजा: आशिया चषक स्पर्धेतील भारत-अफगाणिस्तान सामना (Indian Cricket Team) सुरू होण्यास काही वेळ बाकी असतानाच दुबईत (Dubai) मोठी दुर्घटना घडली आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमच्या (Dubai International Stadium) बाहेर भीषण आग लागली आहे. एकाचवेळी आगीचं तांडव आणि धुराचे लोट पसरल्याने येथील नागरिक धास्तावले आहेत. स्टेडियमच्या बाजूलाच असलेल्या इमारतीत ही आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. त्यानंतर धुराचे लोट उसळले. धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात काळोख दाटला असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, ही आग विझवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा कव्हर करण्यासाठी अनेक भारतीय पत्रकार दुबईत गेले आहेत. स्टेडियम बाहेरच्या इमारतीला आग लागल्यानंतर या पत्रकारांनी तात्काळ याची माहिती ट्विट करत आगीचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत. या आधी स्टेडियममध्ये आग लागल्याची माहिती मिळत होती. स्टेडियमच्या एन्ट्री गेटला आतमध्ये आग लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर ही आग स्टेडियमला नव्हे तर स्टेडियमच्या बाजूलाच असलेल्या इमारतीला लागल्याचं दिसून आलं.

स्टेडियममध्येही धूरच धूर

ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. आगीचे लोळ उठल्यानंतर संपूर्ण परिसरात धूरच धूर झाल्याने काळे ढग दाटून आल्यासारखं चित्रं निर्माण झालं आहे. शिवाय धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. या आगीत इमारतीचे काही मजले जळून खाक झाल्याचंही सांगितलं जात आहे. धुराचे लोट इतके प्रचंड होते की ते स्टेडियमच्या आसपासही दिसत होते. त्यामुळे स्टेडियमलाच आग लागली की काय असं वाटत होतं. दरम्यान, आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग कितीवेळात नियंत्रणात येईल याची काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

भारताचा शेवटचा सामना

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत भारताचा आज आफगाणिस्तान सोबतचा शेवटचा सामना आहे. पाकिस्तानने आफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीतून बाद झाला आहे. त्यामुळे आज भारत-आफगाणिस्तानचा होणारा सामना हा केवळ औपचारिक सामना असणार आहे.