भारत इंग्लंड सामन्यात फ्लडलाइट बंद झाल्याने फजिती! सरकारने उचललं कठोर पाऊल

इंग्लंडविरुद्धचा दुसरा वनडे सामना भारताने 4 गडी राखून जिंकला. पण या सामन्यात फ्लडलाईट बंद झाल्याने फजिती झाली. त्यामुळे अर्धा तासांचा खेळ वाया गेला. यामुळे आता ओडिशा सरकार एक्शन मोडमध्ये आलं आहे. आता ओडिशा क्रिकेट असोसिएशनला दहा दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.

भारत इंग्लंड सामन्यात फ्लडलाइट बंद झाल्याने फजिती! सरकारने उचललं कठोर पाऊल
| Updated on: Feb 10, 2025 | 4:46 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना ओडिशाच्या कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 4 गडी राखून आपल्या खिशात घातला. पण या सामन्यात फ्लडलाईट बंद झाल्याने अर्ध्या तासाचा वेळ वाया गेला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची चर्चा झाली. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 305 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पॉवर प्लेमध्ये चांगलीच फटकेबाजी सुरु केली होती. पण 7 व्या षटकात मैदानातील फ्लडलाईट बंद झाली. त्यामुळे सामना अर्धवट थांबवण्याची वेळ आली. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियोजनाची चर्चा सुरु झाली. इतकंच काय तर असा प्रकार घडल्याने नाचक्की झाली. असं असताना ओडिशा सरकार एक्शन मोडमध्ये आलं आहे. सरकारने ओडिशा क्रिकेट असोसिएशनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सरकारला दहा दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.

ओडिशा सरकारमध्ये स्पोर्ट्स डायरेक्टर सिद्धार्था दास यांनी नोटीस पाठवली आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘9 फेब्रुवारी 2025 ला बाराबती स्टेडियम, कटकमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामना सुरु असताना एक फ्लड लाईट बंद झाली. यामुळे सामन्यात खंड पडला. यामुळे सामना जवळपास 30 मिनिटं थांबवावा लागला. यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांना त्रास झाला.’

ओडिशा क्रिकेट असोसिएशनला या व्यत्ययाच्या कारणाचे तपशीलवार स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच काय तर अशा चुकांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्ती/एजन्सींची माहिती घेण्यासही सांगितलं आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची रूपरेषा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पत्र मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत निष्कर्ष सादर करणे आवश्यक आहे, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना साकिब महमूद गोलंदाजी करत होता. शुबमन गिल स्ट्राईकला होता. तेव्हाच एक फ्लडलाईट बंद झाली. तेव्हा गिलने एक धाव घेत रोहित शर्माला स्ट्राईक दिली. असं असताना 9 मिनिटात तीन वेळ लाईट गेली. त्यामुळे खेळ थांबवला आणि रोहित शर्मा आणि शुबमन गिल डगआऊटमध्ये गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा मैदानात आल्यानवर रोहित शर्माने दोन धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर 1, चौथ्या चेंडूवर 1, त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने चौकार मारला. सहावा चेंडू निर्धाव गेला.