
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. सूर्यकुमार यादव याची कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेतील यूएई विरुद्धची पहिलीच वेळ होती. त्यामुळे सूर्यासमोर भारताला विजय मिळवून देण्याचं आव्हान होतं. सूर्याने हे आव्हान स्वीकारलं आणि भारताला विजयी सुरुवात मिळवून दिली. भारताने यूएई विरुद्ध मोठ्या फरकाने विजय साकारला. टीम इंडियाने यूएईला 57 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने 58 धावांचं आव्हान हे 4.3 षटकांत 1 विकेट गमावून पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेट्स आणि 93 बॉल ठेवून जिंकला. टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. भारतासमोर या सामन्यात पाकिस्तानचं आव्हान असणार आहे.
भारताने पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. त्यामुळे सूर्यासेनेचा विश्वास दुणावला आहे. आता टीम इंडिया पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी सरावाला सुरुवात केली आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी असिस्टंट कोच अभिषेक नायर याने प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेक नायर याच्यानुसार, यूएई विरूद्धच्या झटपट विजयामुळे टीम इंडियाला नुकसान झालंय. अभिषेक शर्माने नक्की काय म्हटलं आणि त्याला नक्की काय सांगायचं होतं? हे जाणून घेऊयात.
जर यूएई विरुद्धचा सामना थोड्या फार प्रमाणात आव्हानात्मक झाला असता तर भारताचा सराव झाला असता,असं मत अभिषेक नायर याने व्यक्त केलं आहे.
“यूएई विरुद्धचा सामना आव्हानात्मक झाला असता तर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी चांगल्या प्रकारे सराव झाला असता. मात्र गौतम गंभीर आणि सूर्युकमार यादव यांनी सामना झटपट संपवण्याचा प्लान केला”, असं अभिषेक नायर याने म्हटलं. नायर आशिया कप स्पर्धेसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसह क्रिकेट एक्सपर्ट म्हणून जोडला गेला आहे. अभिषेकने या कार्यक्रमात बोलताना वरील प्रतिक्रिया दिली.
“चांगला सराव होण्यासाठी परिस्थितीशी एकरुप होणं गरजेचं असतं. मात्र हेड कोच गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांचा विजयासाठी खेळण्यासह सामना झटपट लवकर आटोपण्याचा प्रयत्न होता. मात्र सामना काही प्रमाणात आव्हानात्मक व्हायला पाहिजे होता. परिस्थिती बिकट असल्यावर चांगली तयारी होते”, असं अभिषेकने म्हटलं.
टीम इंडियाला आशिया कप जिंकायला हवा, असं न झाल्यास निश्चित काही तरी चुकीचं झालंय असा याचा अर्थ आहे, असं अभिषेक नायर याने म्हटलं.
“भारताकडे मजबूत संघ आहे. तसेच फिरकीपटू ज्या प्रकारे कामगिरी करत आहेत त्यानुसार या स्पर्धेत पराभूत होणं अवघड आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करत असतील तर विजेतेपद मिळवणं आणखी सोपं होतं. टीम इंडिया दावेदार नाही तर चॅम्पियन म्हणून दुबईला गेली आहे. टीम इंडिया या स्पर्धेत जिंकू शकली नाही तर निश्चित काही तरी चुकीचं झालंय”, असं अभिषेक नायर याने नमूद केलं.