IND vs PAK : यूएईला लोळवलं, आता पाकिस्तानचा नंबर, कॅप्टन सूर्या महामुकाबल्याबाबत एका वाक्यातच म्हणाला
Suryakumar Yadav on India vs Pakistan Match : क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याचे वेध लागले आहेत. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याआधी कर्णधार सूर्याने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांशिवाय आशिया कप स्पर्धेत खेळताना धमाकेदार सुरुवात करत विजयी सलामी दिली. भारताने आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसर्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात होम टीम यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीवर मोठा विजय मिळवला. भारताने अवघ्या 27 चेंडूतच हा सामना निकाली काढला. भारताने यूएईला 57 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने 58 धावांचं आव्हान हे पावरप्लेमध्येच पूर्ण केलं. भारताने 1 विकेट गमावून 4.3 ओव्हरमध्ये 60 रन्स केल्या. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याचा आशिया कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता. सूर्याने आपल्या नेतृत्वात भारताला या स्पर्धेत विजयी सुरुवात मिळवून दिली.
टीम इंडिया या स्पर्धेतील आपला दुसरा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला 14 सप्टेंबरला होणार आहे. महामुकाबल्याचा थरार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. सूर्याने यूएई विरूद्धच्या विजयानंतर महामुकाबल्याबाबत प्रतिक्रिया दिली. सूर्याने या सामन्याबाबत काय म्हटलं हे जाणून घेण्याआधी भारताने यूएई विरूद्ध काय केलं? हे जाणून घेऊयात.
यूएई विरुद्ध टीम इंडिया
भारताने यूएईला 13.1 ओव्हरमध्ये गुंडाळलं. कुलदीप यादव याने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीपने यूएईच्या एकूण चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑलराउंडर शिवम दुबे याने 3 विकेट्स मिळवल्या. तर वरुण चक्रवर्थी, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. त्यानंतर अभिषेक शर्मा याने 30 धावा केल्या. शुबमनने 20 आणि सूर्याने 7 धावांचं योगदान देत भारताला विजयापर्यंत पोहचवलं.
सूर्या विजयानंतर काय म्हणाला?
सूर्याने नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय का घेतला? याबाबत सामन्यानंतर भाष्य केलं. “खेळपट्टी कशी आहे हे पाहायचं होतं”, असं सूर्याने म्हटलं.
तसेच सूर्याने या विजयाबाबत बोलताना प्रामुख्याने गोलंदाजांची नावं घेतली. “कुलदीप यादव याने उल्लेखनीय कामगिरी केली. तर कुलदीपला शिवम दुबे, हार्दक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांची चांगली साथ मिळाली”, असं म्हणत सूर्याने भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं.
सूर्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याबाबत काय म्हणाला?
सूर्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याबाबत 5 शब्दात प्रतिक्रिया दिली. “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत”, असं भारतीय कर्णधाराने म्हटलं.
