Shoaib Malik Resign : राजीनामा दिला नाही तर घेण्यात आला;शोएब मलिकला भाग पाडलं! 50 लाख होता पगार

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार शोएब मलिक याला झटका देत मोठी कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे शोएब मलिक याला 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय. मात्र मेंटोर असलेल्या मलिकने स्वत:हून राजीनामा दिल्याचंही म्हटलं जात आहे.

Shoaib Malik Resign : राजीनामा दिला नाही तर घेण्यात आला;शोएब मलिकला भाग पाडलं! 50 लाख होता पगार
PakistanI Former Cricketer Shoaib Malik
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 14, 2025 | 1:46 PM

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी या दोघांच्या युट्यूब चॅनेल्सवर बंदी टाकण्यात आली. त्यामुळे दोघांची आर्थिक कोंडी झाली. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शोएब मलिक याने मेंटोर म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र मलिकला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं म्हटलं जात आहे. नक्की हे प्रकरण काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्व मेंटॉर विरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पीसीबीने गेल्या वर्षी 5 जणांची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मेंटोर म्हणून नियुक्ती केली होती. मात्र आता पीसीबीने कारवाईचा बडगा उचलला आहे. शोएब मलिक पीसीबीच्या कारवाईचा पहिला शिकार झाल्याचं म्हटलं जात आहे. शोएब मलिक टीम स्टालियंसचा मेंटोर होता.

वर्षभरात गेट आऊट!

पीसीबीने गेल्या वर्षी 26 ऑगस्ट 2024 रोजी डॉल्फिंस, लायंस, पँथर्स, स्टायलिंस आणि माखोर्स या 5 संघासाठी मेंटोर म्हणून माजी खेळाडूंची नियुक्ती केली होती. शोएब व्यतिरिक्त मिस्बाह उल हक, वकार युनिस, सर्फराज अहमद आणि साकेलन मुस्ताक यांची 3 वर्षांसाठी मेंटोर म्हणून नियुक्ती केली होती. तसेच 50 लाख रुपये वेतन निश्चित करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा माजी गोलंदाज तनवीर अहमद याने मेंटोरना देण्यात येणाऱ्या वेतनावरुन आक्षेप घेतला होता. हे 50 लाख रुपये देण्याच्या पात्रतेचे आहेत का? असा सवाल अहमदने उपस्थित केला होता.

पीसीबीने काढलं की स्वत:हून सोडलं?

मोहसिन नकवी पीसीबीचे अध्यक्ष आहेत. नकवी यांनी 5 मेंटोर्सचा पत्ता कट करण्याची मोहिम हाती घेणार असल्याचं सूत्रांनुसार स्थानिक माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याआधीच शोएब मलिकने 13 मे रोजी राजीनामा दिला. शोएब मलिकनुसार, आपण राजीनामा देणार असल्याचं 2 आठवड्यांआधीच कळवलं होतं. त्यामुळे शोएब मलिकने खरंच स्वत:हून राजीनामा दिलाय की त्याला तसं करण्यात भाग पाडलंय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आता चौघांचा नंबर!

दरम्यान शोएब मलिकच्या राजीनाम्यानंतर 4 मेंटोरचा नंबर आहे, असं स्थानिक मीडिया सूत्रांच्या हवाल्याने दाखवत आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये सर्फराज अहमद, वकार युनूस, साकेलन मुश्ताक आणि मिस्बाह उल हक यांचं काय होतं? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.