गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक

भारताच्या माजी क्रिकेटपटूने काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेतील टी20 लीग स्पर्धेत एका संघाची भागीदारी विकत घेतली होती. त्यामुळे नवं पर्व सुरु होणार असल्याने श्रीलंकेत गेला होता. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय झालं? जाणून घ्या.

गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक
शुबमन गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी केली अटक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2026 | 5:02 PM

टीम इंडियचा कर्णधार शुबमन गिलसोबत क्रिकेट खेळलेला माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणात अटक केली आहे. भारताच्या अंडर 19 संघातील माजी फलंदाज मनजोत कालराला श्रीलंकेत बेड्या ठोकल्या आहेत. श्रीलंकन क्रिकेटपटूला लाच देण्याच्या आरोपाखाली कालराला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील जाफन किंग्स फ्रेंचायझीचा सहमालक असलेल्या मनजोत कालराला श्रीलंकेत 17 जुलैला अटक करण्यात आली. कोलंबोतील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. श्रीलंकन पोलिसांच्या स्पोर्ट्स एन्व्हेस्टिगेशन युनिटने माजी भारतीय अंडर 19 क्रिकेटपटू कालरा लंका प्रीमियर लिगी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेड्या ठोकल्या. पोलीस अधिकारी सुपुन विदानगे यांनी सांगितलं की, कालरा एका खेळाडूला 95 लाख श्रीलंकन रुपये म्हणजेच जवळपास 27.7 लाख रुपये देण्याच्या तयारीत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालरावर ज्या खेळाडूला लाच देण्याचा ठपका ठेवला आहे. त्याच खेळाडूने दहा दिवसांपूर्वी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. जाफना किंग्सच्या मालकाने पहिल्यांदाच या खेळाडूशी संपर्क साधला होता. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला होता. तसेच त्याला अटक केली असून कोर्टात उभं केलं जाणार आहे. दुसरीकडे, आरोपीने आणखी दोन खेळाडूंशी संपर्क साधला असल्याचं उघड झालं आहे. पण इतर खेळाडूंची ओळख पटू शकली नाही.

अंडर 19 वर्ल्डकप 2018 मध्ये भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघात दिल्लीचा मनजोत कालरा होता. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात या वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. या संघात भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल देखील होता. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात कालराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकलं आणि भारताला विजेतेपद मिळवून मोलाचं योगदान दिलं होतं. पण त्यानंतर एका वर्षानंतर एज फ्रॉड वादात अडकला होता. 2020 मध्ये दिल्ली क्रिकेटने त्याच्यावर काही वर्षांची बंदी घातली. त्यानंतर कालरावरील बंदी हटवली गेली, पण व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याने पुनरागमन केलं नाही. त्यानंतर मे 2026 मध्ये कालराने जाफना किंग्स संघाची काही भागीदारी विकत घेत सहमालक ठरला होता.

Follow Us