इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला गावस्कर यांनी दिला सल्ला, जर तसं केलं नाही तर…

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिल पर्वाचा उदय झाला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिलकडे सूत्र आली आहेत. इंग्लंड दौऱ्यापासून शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शुबमन गिलचे कान टोचले आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलला गावस्कर यांनी दिला सल्ला, जर तसं केलं नाही तर...
शुबमन गिल
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
Updated on: May 26, 2025 | 8:11 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यापासून करणार आहे. हा दौरा भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. तसेच शुबमन गिलला इतिहास रचण्याची संधी देखील आहे. 2007 नंतर आतापर्यंत एकही कर्णधार इंग्लंडमध्ये मालिका जिंकलेला नाही. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने मालिका जिंकली होती. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाची धुरा सांभाळली. मात्र कोणालाच यश मिळालं नाही. 2021-22 मध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका ड्रॉ झाली होती. आता गिलकडे 2007 चा इतिहास रचण्याची संधी आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी शुबमन गिलला एक सल्ला दिला आहे. शुबमन गिलने हा सल्ला अंगीकृत केला तर नक्कीच पदरी यश पडेल. यासाठी त्याला स्वत:मध्ये एक बदल करावा लागणार आहे.

काय म्हणाले सुनील गावस्कर?

सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, ‘कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर पडली की प्रत्येक खेळाडू दबावात असतो. कारण संपूर्ण संघाला घेऊन पुढे जायचं असतं.’ शुबमन गिल सध्या आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सचं नेतृत्व करत आहे. तसेच कर्णधारपदाच्या ओझ्याखाली फलंदाजीही व्यवस्थित करत आहे. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाबाबत कोणीही शंका घेत नाही. पण असं असातना सुनील गावस्कर म्हणाले की, ‘टीम मेंबर असणं आणि कर्णधार असणं यात फरक आहे. कारण जेव्हा तुम्ही मेंबर असता तेव्हा फक्त जवळच्या क्रिकेटरसोबतच चर्चा करता. पण आता कर्णधार आहात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपला सन्मान करावा असं वागलं पाहीजे. एका कर्णधाराला त्याच्या कामगिरीपेक्षा वागमं खूपच महत्त्वाचं ठरतं.’

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. खरं तर इंग्लंड दौरा भारतासाठी खूपच कठीण जाणार हे दिसत आहे. कारण या संघात अनुभवी खेळाडूंची उणीव आहे. त्यामुळे विजय मिळवणं आणि सामना ड्रॉ करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. तसेच होम ग्राउंड असल्याने पराभूत करणं भारतीय संघाला जड जाईल. त्यामुळे या कसोटी मालिकेत खऱ्या अर्थाने शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.