Hamza Zahoor: एका कागदावर लिहिलेलं स्वप्न, दुसऱ्याच दिवशी मैदानात खरं केलं! हमजानं भारताला हरवलं अन् चिठ्ठी दाखवून सगळ्यांचं लक्ष वेधलं, लिहिलं होतं…
Hamza Zahoor Viral Note: सामना सुरू होण्याआधीच हमजाने विजयाचा निर्धार केला होता. त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं, हे शतकानंतर स्वतःच दाखवलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना म्हटलं की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, ए टीमचा सामना असो किंवा अंडर-19 क्रिकेट; दोन्ही देशांमधील प्रत्येक सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष असतं. रविवारी (8 नोव्हेंबर) अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात असाच अटीतटीचा सामना रंगला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला तो पाकिस्तानचा फलंदाज हमजा जहूर. विशेष म्हणजे या सामन्यानंतर हमजाने दाखवलेल्या एका चिठ्ठीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हमजाने चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं?
भारताविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी हमजा जहूरने एका कागदावर स्वतःसाठी एक लक्ष्य लिहिलं होतं. भारताविरुद्ध अर्धशतक झळकवायचं आणि पाकिस्तानला सामना जिंकून द्यायचा, असा निर्धार त्याने या चिठ्ठीत व्यक्त केला होता. विशेष म्हणजे, हमजाने केवळ अर्धशतकाचं लक्ष्य ठेवलं होतं; मात्र प्रत्यक्ष सामन्यात त्याने शतक झळकावत स्वतःच्याच अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केली. रविवारी भारताविरुद्ध मैदानात उतरलेल्या हमजाने दमदार फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांचा सामना करत त्याने शानदार शतक झळकावलं. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला पराभूत केलं.
सामना जिंकल्यानंतर हमजाने मैदानात तीच चिठ्ठी दाखवली. त्याने एक दिवस आधी स्वतःशी केलेला निर्धार पूर्ण केल्याचं या सेलिब्रेशनमधून दाखवून दिलं. हमजाच्या या सेलिब्रेशनचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याआधी स्वतःसाठी ठरवलेलं लक्ष्य, त्यानंतर मैदानात केलेली शतकी खेळी आणि विजय मिळवल्यानंतर चिठ्ठी दाखवण्याची कृती यामुळे हमजा चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे, त्याने चिठ्ठीत अर्धशतकाचं लक्ष्य ठेवलं होतं. पण प्रत्यक्षात शतक झळकावून भारताविरुद्ध पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले. हा सामना अल अमेरत क्रिकेट मैदानावर खेळला गेला. अपेक्षेप्रमाणे, सामना अटीतटीचा झाला, पण पाकिस्तानने विजय मिळवला.
दिवाळीत झालेल्या भारताच्या पराभवाने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन देशांमधील सामने एकतर्फीच राहिले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तानला सहज हरवले होते, पण 8 नोव्हेंबर रोजी हमजा झहूरने सामना जिंकून देणारे शतक झळकावून भारतीय संघाकडून विजय हिसकावून घेतला.