Happy Birthday MS Dhoni: क्रिकेटरच नाही हॉटेलियर, शेतकरी आणि बिझनेसमध्येही कॅप्टन कूलची जोरदार बॅटिंग

| Updated on: Jul 07, 2022 | 3:38 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. क्रिकेटच्या मैदानात धुवाधार खेळी करणाऱ्या धोनीने निवृत्तीनंतर बिझनेस जगतावर लक्ष्य केंद्रित केले आहे. रांचीमध्ये त्याचे एक हॉटेल आहे, तसेच तो ऑरगॅनिक शेतीही करतो. याशिवाय त्याने अनेक कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

Happy Birthday MS Dhoni: क्रिकेटरच नाही हॉटेलियर, शेतकरी आणि बिझनेसमध्येही  कॅप्टन कूलची जोरदार बॅटिंग
ms dhoni
Image Credit source: instagram
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाचा ( Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटच्या पिचप्रमाणेच उद्योग जगतातही जोरदार फलंदाजी करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्त झाल्यानंतर धोनीने बिझनेस आणि गुंतवणूक क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली आहे. क्रिकेटच्या पिचप्रमाणेच इथेही तो नव्या खेळाडूंवर विश्वास ठेवताना दिसतो. त्यामुळेच धोनीने अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये (Startup Companies) गुंतवणूक केली आहे. सेकंड हँड कार विकणारी कंपनी कार्स 24 (Cars24), इंटिरिअर डेकोरेशन करणारी कंपनी होमलेनमध्ये (Homelane), ड्रोन बनवणारी गरूड एअरोस्पेस अशा अनेक कंपन्यांमध्ये त्याने महत्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय रांचीमध्ये त्याचे हॉटेलही आहे. तसेच तो ऑरगॅनिक शेतीही करतो

ड्रोन बनवणाऱ्या कंपनीतही गुंतवणूक

भारताचा माज कर्णधार असणाऱ्या धोनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात नव्या कंपनीचे नाव आहे गरुड एअरोस्पेस. सध्या वेगाने प्रगती करणाऱ्या ड्रोन बिझनेसमध्ये गुंतवणूकीची घोषणा धोनीने नुकतीच केली होती. त्याने या कंपनीत नुसती गुंतवणूकच केली नसून तो या कंपनीचा ब्रँड ॲंबॅसेडरही आहे. मात्र त्याने गरुड एअरोस्पेसमध्ये नक्की किती गुंतवणूक केली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. 2015 साली या कंपनीची सुरूवात झाली होती. कमी बजेटमध्ये ड्रोनसंदर्भातील सोल्यूशन्स देण्यावर कंपनीचा फोकस आहे. गरुड एअरोस्पेस ही कंपनी, सॅनिटायझेशन, ॲग्रीकल्चर, मॅपिंग, सिक्युरिटी, डिलीव्हरी इत्यादी सेवा पुरवते.

होमलेन (Homelane)मध्येही धोनीने केली इन्व्हेस्टमेंट

गरुड एअरोस्पेसमधील गुंतवणुकीपूर्वी धोनीने गेल्या वर्षी होमलेन (Homelane) कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी गृहसजावटीची उत्पादने बनवते. धोनीसोबत तीन वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट करण्यात आल्याचे कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जाहीर केले होते. त्यासोबतच धोनी या कंपनीचा इक्विटी पार्टनरही आहे. 2014 साली सुरू झालेल्या या कंपनीची दिल्ली एनसीआर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, कोलकातासह १६ शहरात कार्यालये आहेत.

खाताबुकच्या जाहिरातीतही दिसतो धोनी

सध्या वेगाने वाढणाऱ्या फिनटेक कंपनी खाताबुक (Khatabook) या कंपनीचा धोनी 2020 सालापासून ब्रँड ॲंबॅसेडर आहे. या कंपनीत गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.याशिवाय धोनी कार्स 24 चा ब्रँड ॲंबॅसेडर असून त्याने त्यातही गुंतवणूक केली आहे. कार्स 24ने सेकंड हँड कारच्या बाजाराला औपचारिक रूप दिले आहे.

खेळाडूंचे कौशल्य सुधारण्यास मदत करणारी रन ॲडम या कंपनीचे नावही धोनीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये आहे. 2018 साली त्याने या कंपनीत गुंतवणूक केली होती. त्याशिवाय स्पोर्ट्सफिट प्रायव्हेट लिमिटेडमध्येही त्याची गुंतवणूक आहे. इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल टीम चेन्नय्यन एफसी (Chennaiyin FC)चीही मालकी त्याच्याकडे आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि तो यामध्ये पार्टनर आहेत. हॉकी इंडिया लीगमधील रांची रेज टीममध्येही धोनीने महत्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.

7 नंबर अजूनही धोनीसोबत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या जर्सीचा नंबर होता 7. या जर्सीसोबतचा प्रवास त्याने बाहेरही कायम ठेवला असून त्याने ‘सेव्हन’ (7) नावाने एक फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड सुरू केला आहे. त्याच्याकडे मास्टरस्ट्रोक या फुटवेअर ब्रॅंडची पूर्ण मालकी आहे. धोनी सेव्हन या ब्रँडचा ग्लोबल ब्रँड ॲंबॅसेडरही आहे.

हॉटेल आणि ऑरगॅनिक शेतीतही धोनीची गुंतवणूक

धोनीच्या इतर महत्वपूर्ण गुंतवणुकीमध्ये हॉटेल माही रेसिडन्सी (Hotel Mahi Residency) आणि ऑरगॅनिक फार्मिंगचाही (Organic Farming) समावेश आहे. माही रेसिडन्सी हे हॉटेल रांचीमध्ये आहे.