
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. साखळी फेरीत दोन सामने जिंकल्यानंतर बाद फेरीत स्थान मिळालं. मात्र येथे टीम इंडियाने क्रीडारसिकांना नाराज केलं नाही. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. खासकरून पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण या विजयानंतर युवराज सिंग, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची एक कृती पाहून त्यांच्यावर टीका सुरु झाली. या व्हिडीओत तिन्ही खेळाडू वेगळ्याच शैलीत विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. या व्हिडीओमागे विकी कौशलच्या आगामी चित्रपटातील बॅड न्यूजमधील ‘हुस्न तेरा तौबा तौबा’ हे गाणं आहे. यात युवराज सिंग कमरेवर हात ठेवून, हरभजन सिंग पाय पकडून, तर सुरेश रैना डान्स केल्यानंतर पाय पकडताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. या माध्यमातून अपमान केल्याची भावना व्यक्त करत आहेत. आता यावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने माफीनामा दिला आहे. तसेच व्हिडीओ डिलिट केला आहे.
‘एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे की, वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तोबा तोबा या व्हिडीओप्रकरणी सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही प्रत्येकाचा आणि समाजाचा सन्मान करतो. आम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून फक्त 15 दिवस सलग खेळल्यानंतर शरीराची झालेली स्थिती दाखवायची होती. शरीराची दुखापत यातून अधोरेखित केली होती. कोणालाही दुखवण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता. पण तरीही लोकांना आम्ही चुकीचं केलं असं वाटत असेल तर मी त्या प्रत्येकाची माफी मागतो. कृपया, आता हे इथेच थांबवा आणि पुढे जाऊयात. आनंदी राहा, चांगलं आरोग्य लाभो.’, असा माफीनामा हरभजन सिंग याने दिला आहे.
🚨 INSTAGRAM STORY BY HARBHAJAN SINGH 🚨 pic.twitter.com/wN1CePDBVw
— Johns. (@CricCrazyJohns) July 15, 2024
दरम्यान अंतिम सामन्यात पाकिस्तानने 20 षटकात 157 धावांचं आव्हान ठेवलं होत. या सामन्यात अंबाती रायुडूने आक्रमक खेळी केली. 30 चेंडूत 50 धावा ठोकल्या आणि टीम इंडियाचा विजय सोपा केला. युसूफ पठाणने शेवटी येत 16 चेंडूत 30 धावा केल्या. पाकिस्तानने दिलेलं लक्ष्य टीम इंडियाने 19.1 षटकात पूर्ण केलं. तसेच जेतेपदावर नाव कोरलं.