Team India: 5 ओव्हरच्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, फक्त 6 खेळाडूंचीच निवड, रॉबिन उथप्पा कॅप्टन

Team India Squad For Hong Kong Sixes Tournament : 5 षटकांच्या स्पर्धेसाठी 7 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रॉबिन उथप्पा या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

Team India: 5 ओव्हरच्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, फक्त 6 खेळाडूंचीच निवड, रॉबिन उथप्पा कॅप्टन
robin uthappa team india
Image Credit source: Icc X account
| Updated on: Oct 12, 2024 | 5:06 PM

हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे अखेरीस 2017 साली करण्यात आलं होतं. तर यंदा या स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी 7 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रॉबिन उथप्पा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. ‘क्रिकेट हाँगकाँग’या सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियाने 2005 साली रॉबिन सिंह याच्या नेतृत्वात या स्पर्धेत विजय मिळवला होता. तर भारताला 1996 साली उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

टीम इंडियात कोण-कोण?

रॉबिन उथप्पा कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच माजी ऑलराउंडर केदार जाधव आणि स्टूअर्ट बिन्नी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मनोज तिवारी याची निवड करण्यात आली आहे. माजी स्पिनर शाहबाज नदीम आणि विकेटकीपर बॅट्समन श्रीवत्स गोस्वामी देखील टीम इंडियकाडून खेळणार आहे. तर देशांतर्गत स्पर्धेत ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी करणाऱ्या भरत चिपली याचीही निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?

टीम इंडिया या स्पर्धेत बी ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह यूएईचा समावेश आहे. पाकिस्तान टीमने एकूण 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

हटके नियम

स्पर्धेतील सामने हे प्रत्येकी 5-5 षटकांचे असतील. एका संघात 6-6 खेळाडू असतील. विकेटकीपरला वगळता प्रत्येक खेळाडूला 1-1 ओव्हर टाकावी लागेल. तसेच बॉलरने नो-वाईड बॉल टाकल्यास अतिरिक्त 2 धावा दिल्या जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाईड आणि नो बॉल फेकल्यास अतिरिक्त 1 धाव दिली जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 विकेट्स गेल्यावर टीम ऑलआऊट होते, तर 1 खेळाडू नाबाद परततो. या स्पर्धेत 5 विकेट्स गेल्यानंतर सहावा फलंदाज एकटा खेळू शकतो. मात्र त्याच्या सोबतीला एक खेळाडू नॉन स्ट्राईकला असेल. सहाव्या फलंदाजाने एक धाव घेतली तरी तोच पु्न्हा स्ट्राईरवर येऊन खेळेल. सहावा फलंदाज आऊट होताच टीम ऑलआऊट होईल.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी टीम इंडिया

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ : रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी आणि स्टुअर्ट बिन्नी.