
अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र टीममध्ये दाखल झालेला ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ याने धमाका केला आहे. पृथ्वी शॉ याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाराष्ट्राच्या दुसऱ्या आणि कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक झळकावलं आहे. पृथ्वीने या खेळीसह कर्णधार म्हणून दणक्यात सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्राला या स्पर्धेत पहिला विजय मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिलं. पृथ्वीने या खेळीसह आयपीएल 2026 च्या आगामी मिनी ऑक्शनसाठीही दावा ठाकला आहे. पृथ्वी गेल्या मोसमात अनसोल्ड राहिला होता.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीला ऋतुराजच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राची या मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतासमोर दुसऱ्या सामन्यात हैदराबादचं आव्हान होतं. हैदराबादने महाराष्ट्रसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. महाराष्ट्राने हे आव्हान 8 बॉलआधी 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. महाराष्ट्राने 18.4 ओव्हरमध्ये 192 रन्स केल्या आणि विजय साकारला.
महाराष्ट्राला विजयी करण्यात अर्शीन कुलकर्णी याने प्रमुख भूमिका बजावली. तसेच पृथ्वीने त्याला अप्रतिम साथ दिली. पृथ्वी-अर्शीन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वीने या दरम्यान अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अर्शीन आणि पृथ्वीची फटकेबाजी पाहून महाराष्ट्राचा 10 विकेट्सने विजय होणार, असंच वाटत होतं. मात्र पृथ्वी आऊट होताच ही जोडी फुटली. पृथ्वी आणि अर्शीनने पहिल्या विकेटसाठी 73 बॉलमध्ये 117 रन्सची पार्टनरशीप केली.
पृथ्वीने 36 बॉलमध्ये 183.33 च्या स्ट्राईक रेटने 66 रन्स केल्या. पृथ्वीने या खेळीत 3 षटकार आणि 9 चौकार लगावले. पृथ्वीनंतर अझीम काझी 8 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर अर्शीन आणि राहुल त्रिपाठी या जोडीने महाराष्ट्राला विजयी केलं. राहुलने 11 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. तर अर्शीनने 54 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकार लगावले.