IND vs ENG : “मी तक्रार करत..”, 5 विकेट्स घेतल्यानंतरही पराभूत झाल्याने वरुणने बोलून दाखवलं
Varun Chakravarty IND vs ENG 3rd T20i : वरुण चक्रवर्थीने 5 विकेट्स घेत टीम इंडियाला सलग तिसरा विजय मिळवून देण्यात आपली भूमिका चोख बजावली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाचा विजय होऊ शकला नाही. फलंदाज अपयशी ठरले. वरुणने सामन्यानंतर आपली खदखद व्यक्त केली.

टीम इंडियाने इंग्लंडला सलग 2 टी 20I सामन्यांमध्ये पराभूत करत तडाख्यात सुरुवात केली होती. त्यामुळे टीम इंडियाला 28 जानेवारीला राजकोटमध्ये तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची दुहेरी संधी होती. त्यानुसार टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. वरुण चक्रवर्थी याने 5 विकेट्स घेतल्याने टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले आणि सामना गमावला. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्थी याला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. वरुणने सामन्यानंतर आपली खदखद बोलून दाखवली.
वरुणने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या. वरुणची ही टी 20I कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची दुसरी वेळ ठरली. त्यामुळेच इंग्लंडला 171 धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र प्रत्युत्तरात टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावांपर्यंतच पोहचता आलं. इंग्लंडने अशाप्रकारे विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखलं. इंग्लंड या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.
वरुण चक्रवर्थी काय म्हणाला?
“आम्ही यशस्वी होऊ शकलो नाहीत ही दुख:द बाब आहे. मात्र क्रिकेटचा हा मुळ स्वभाव आहे. आम्हाला हा पराभव विसरून पुढे जावं लागेल. तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा काही जबाबदारी असते. मी भविष्यातही अशीच कामगिरी करेन, अशी आशा आहे”, असं वरुणने म्हटलं.
तसेच वरुणने 1 ओव्हरच्या स्पेलवरुनही प्रतिक्रिया दिली. “कॅप्टन सूर्यकुमार यादवने अनेकदा माझ्याकडून सलग 4 ओव्हर बॉलिंग करुन घेतली आहे. मात्र मी तक्रार करत नाही. मी प्रत्येक गोष्टीसाठी मानसिकरित्या तयार असतो. कदाचित मी या स्तरावर आतापर्यंत सर्वोत्तम बॉलिंग केली आहे. तसेच निश्चितच पुढेही अशीच कामगिरी करत राहणार”, असा विश्वास वरुणने व्यक्त केला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.