मैदानात वेळ वाया घातला तर मॅच फिरणार, क्रिकेटसाठी नवे नियम लागू, आयसीसीकडून मोठे बदल

आयसीसीने आता क्रिकटेच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटचे सामने आणखी थरारक झालेले पाहायला मिळू शकतात. काय काय बदललं आहे, जाणून घेऊयात.

मैदानात वेळ वाया घातला तर मॅच फिरणार, क्रिकेटसाठी नवे नियम लागू, आयसीसीकडून मोठे बदल
Cricket rule Changes
Image Credit source: social media
| Updated on: Oct 02, 2026 | 1:44 AM

आयसीसीने क्रिकेटच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. जे 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. सध्या हे नियम सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना लागू होणार नाहीत. इथून पुढच्या तारखांना सुरु होणाऱ्या मालिकांना हे नियम नक्की लागू असणार आहेत. त्यामुळे आता क्रिकेटचा खेळही आधीपेक्षा जास्त थरारक होणार आहे.  फलंदाजी करताना वेळ वाया घालवण्यापासून ते कसोटी सामन्यात पिंक बॉल वापरण्यापर्यंत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच ओव्हरथ्रो, रनआउट आणि स्टम्पिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील डावाच्या ब्रेकबाबतही नवीन नियम करण्यात आला आहे. नियमांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वेळ खराब केल्यास थेट 5 धावांचा दंड

फलंदाजी करणाऱ्या संघाकडून वेळ वाया घालवला जात असल्यास प्रथम फलंदाजाला इशारा दिला जाईल. पुन्हा अशीच चूक झाल्यास दुसऱ्यांदा इशारा दिला जाईल. मात्र तिसऱ्यांदा वेळ वाया घालवल्यास फलंदाजाच्या संघाच्या धावसंख्येतून थेट 5 धावा कमी केल्या जातील. या 5 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जमा केल्या जातील. त्यामुळे याचा फटका जिंकण्याच्या शक्यतेवरही होईल, असं म्हटलं जातंय.

Loading...

दिवसाच्या कसोटीतही पिंक बॉलचा वापर

कसोटी क्रिकेटमध्ये खराब प्रकाशामुळे खेळ थांबण्याची वेळ अनेकदा येते. आता दोन्ही संघांच्या सहमतीने दिवसाच्या कसोटी सामन्यातही पिंक बॉलचा वापर करता येणार आहे. त्यामुळे प्रकाश कमी झाल्यास लाल चेंडूऐवजी पिंक बॉलचा वापर करून सामना सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल. याआधी पिंक बॉलचा वापर प्रामुख्याने डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये केला जात होता.

शेवटच्या षटकाचा नियम बदलला

कसोटी सामन्यात दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विकेट पडली म्हणून षटक लगेच संपणार नाही. जर त्या षटकातील काही चेंडू बाकी असतील आणि खेळ सुरू ठेवण्याची परिस्थिती असेल, तर उर्वरित चेंडू टाकले जातील. म्हणजेच विकेट पडल्यानंतर दिवसाचा खेळ आपोआप संपवला जाणार नाही.

ओव्हरथ्रोची व्याख्या स्पष्ट

ओव्हरथ्रोबाबतही नियमांमध्ये स्पष्टता करण्यात आली आहे. स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेकण्याचा क्षेत्ररक्षकाचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ओव्हरथ्रो मानला जाईल. मात्र साध्या पद्धतीने झालेल्या मिसफिल्डचा त्यामध्ये समावेश केला जाणार नाही.

रनआउट आणि स्टम्पिंगसाठी पूर्ण नियंत्रण आवश्यक

रनआउट किंवा स्टम्पिंग करताना बेल्स पाडण्यासाठी क्षेत्ररक्षकाकडे चेंडूवर पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक असेल. केवळ बेल्सला हात लागला किंवा बेल्स पाडल्या गेल्या म्हणून फलंदाजाला बाद देता येणार नाही. चेंडूवर क्षेत्ररक्षकाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे स्पष्ट होणे गरजेचे असेल.

महिला क्रिकेटसाठी चेंडूचे निकष

पुरुष, महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी चेंडूंच्या आकारमान आणि वजनाच्या आधारे तीन वेगवेगळ्या श्रेणी निश्चित केल्या जाणार आहेत. त्यामुळे महिला आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूंबाबत स्वतंत्र निकष निश्चित होतील.

टी-20 सामन्यात डावाच्या ब्रेकचा निश्चित वेळ

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन डावांमधील ब्रेकसाठी 15 मिनिटांचा निश्चित कालावधी लागू करण्यात आला आहे. मात्र सामन्याची एकूण वेळ काही कारणामुळे कमी करण्यात आली असेल, तर हा ब्रेक 10 मिनिटांपर्यंत कमी करता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us