
टीम इंडियाने मंगळवारी 4 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर आज 5 मार्चला उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडने निर्णायक टॉस जिंकला. कर्णधार मिचेल सँटनर याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेसमोर किती धावांचा डोंगर उभारणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
न्यूझीलंडने उपांत्य फेरीत बी तर दक्षिण आफ्रिकेने ए ग्रुपमधून क्वालिफाय केलंय. न्यूझीलंडने साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकले. तर टीम इंडियाने न्यूझीलंडला साखळी फेरीतील तिसर्या आणि अंतिम सामन्यात पराभूत केलं. तर दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी पाहता तुल्यबळ लढत होईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 73 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडवर वरचढ राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेने 73 पैकी 42 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 26 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय निकाल लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे .
न्यूझीलंडने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कोणताही बदल केलेला नाही. तर दक्षिण आफ्रिकेने एकमेव बदल केला आहे. नियमित कर्णधार टेम्बा बावुमा याचं कमबॅक झालं आहे. टेम्बाला आजारामुळे 1 मार्च रोजी साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळता आलं नव्हतं. हा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आला होता.
दक्षिण अफ्रीका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), रयान रिकेलटन, रासी वन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, एडन मार्करम, वियान मुल्डर, मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.