
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील चौथा आणि बी ग्रुपमधील दुसरा सामना शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चिर प्रतिद्वंदी मैदानात उतरणार आहेत. स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोनही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात कोणता संघ यशस्वी ठरतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंग्लंडने नुकताच भारत दौरा केला होता. इंग्लंडला या दौऱ्यातील टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे इंग्लंडचा हा मालिका पराभव विसरून नव्याने आणि विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 साली चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर इंग्लंडला 2004 आणि 2013 साली उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तर मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. तसेच मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत मोजक्या प्रमुख खेळाडूंशिवाय कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलंय.
दरम्यान या सामन्याला शनिवारी 22 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ-हॉटस्टारवर सामना लाईव्ह पाहायला मिळेल.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिल सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंगलिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अॅबॉट, बेन द्वारशुइस, अॅडम झॅम्पा, तनवीर सांघा, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी .