IND vs AUS CT 2025 : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने धुव्वा, ‘विराट’ खेळीसह 2023 च्या पराभवाचा वचपा

India vs Australia Semi Final 2025 : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला उपांत्य फेरीत विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान विराट कोहली याच्या शानदार खेळीच्या मदतीने पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

IND vs AUS CT 2025 : टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने धुव्वा, विराट खेळीसह 2023 च्या पराभवाचा वचपा
virat kohli ind vs aus sf ct 2025
Image Credit source: Icc X account
| Updated on: Mar 04, 2025 | 10:09 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 48.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 267 धावा केल्या. विराट कोहली हा या विजयाचा नायक ठरला. तसेच श्रेयस अय्यरसह इतरांनीही विजयात निर्णायक योगदान दिलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा वचपाही घेतला.

टीम इंडियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाने 265 धावांचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाला 50 धावांच्या आत 2 मोठे झटके दिले. ऑस्ट्रेलियाने शुबमन गिल आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा या दोघांना आऊट केलं. शुबमनने 8 तर विराटने 28 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाने 2 बाद 43 अशी स्थिती झाली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरत 91 धावांची भागीदारी केली. टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली असं असताना ही जोडी फुटली. श्रेयस अय्यर 62 चेंडूत 3 चौकारांसह 45 धावा करुन माघारी परतला.

अक्षरचं महत्त्वपूर्ण योगदान

श्रेयसनंतर अक्षर पटेल मैदानात आला. विराट आणि श्रेयस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. अक्षरने या दरम्यान महत्त्वाच्या धावा केल्या आणि विजयाजवळ आणून ठेवण्यात योगदान दिलं. अक्षरने 30 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह 27 रन्स केल्या. अक्षरला नॅथन एलीस याने बोल्ड केलं. एका बाजूला सहकारी आऊट होत होते, मात्र विराटने एक बाजू लावून धरली होती. त्यामुळे टीम इंडियाच जिंकणार, हा विश्वास होता.

केएलची संयमी खेळी

अक्षरनंतर केएल राहुल मैदानात आला. विराट आणि केएल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 47 रन्स जोडल्या. त्यानंतर विराट मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. मात्र तोवर विराटने त्याचं काम पूर्ण झालं होतं. विराटने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने 98 बॉलमध्ये 84 रन्स केल्या. विराटच्या या खेळीत 5 चौकार लगावले.

हार्दिकची फटकेबाजी

विराट आऊट झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. टीम इंडियाला विजयासाठी बॉल टु बॉल रन्स हव्या होत्या. मात्र हार्दिक मैदानात असल्याने चिंता नव्हती. हार्दिकने हा विश्वास सार्थ ठरवला. हार्दिकने 3 षटकार आणि 1 चौकारासह 24 चेंडूत 28 महत्त्वपूर्ण 28 धावा केल्या. मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असताना हार्दिक आऊट झाला. हार्दिकनंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने 48 व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि केएलला स्ट्राईक दिली. केएलने 49 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला आणि टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये

तसेच ऑस्ट्रेलियासाठी नॅथन एलिस आणि अ‍ॅडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कूपर कॉनोली आणि बेन द्वारशुइस या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मात्र याचा काही फायदा होऊ शकला नाही.

19 नोव्हेंबर 2023 चा वचपा

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह 19 नोव्हेंबर 2023 चा वचपा काढला. याच ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमध्ये अंतिम फेरीत पराभूत केल्याने टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. मात्र आता 15 महिन्यांनी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाचा हिशोब बरोबर केला आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.