
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मायदेशात झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची यशस्वी सांगता केली. टीम इंडिया गतविजेता आणि यजमान म्हणून आपल्याकडे वर्ल्ड कप कायम राखण्यात यशस्वी ठरली. इंडिया यासह सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच टीम ठरली. सूर्याने आपल्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात भारताला चॅम्पियन केलं. सूर्याने द्विपक्षीय टी 20i मालिकेतील कामगिरी या स्पर्धेतही कायम राखत कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. सूर्यासाठी हा वर्ल्ड कप अविस्मरणीय ठरला. तर काही खेळाडूंसाठी ही स्पर्धा कर्णधार म्हणून प्रवास संपवणारी ठरली. अफगाणिस्तानच्या राशीद खान याच्यानंतर आता आणखी एका खेळाडूने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
आयर्लंडचा अनुभवी सलामीवीर पॉल स्टर्लिंग याने टी 20i कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र स्टर्लिंग एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार आहे. पॉलच्या नेतृत्वात आयर्लंडला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलं नाही. आयर्लंडचं पहिल्याच फेरीतून आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर पॉलने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आयर्लंडने साखळी फेरीत ओमानवर मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आयर्लंडने ओमानचा 96 धावांनी धुव्वा उडवला होता. मात्र ऑस्ट्रेलिया आणि सहयजमान श्रीलंकेने पराभूत केल्याने आयर्लंडचा साखळी फेरीतूनच बाजार उठला. त्यामुळे आयर्लंडला सुपर 8 फेरीही गाठता आली नाही.
तसेच पॉलला कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही काही करता आलं नाही. पॉलने श्रीलंकेविरुद्ध 6 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 धाव करताच त्याच्या खेळीचा शेवट झाला. पॉलला त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं. आता पॉल खेळाडू म्हणून टी 20i क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.
दरम्यान पॉल आयर्लंडचा सर्वात अनुभवी आणि सक्रीय खेळाडू आहे. पॉलने आयर्लंडचं 48 टी 20i सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. पॉलने त्याच्या नेतृत्वात आयर्लंडला 48 पैकी 20 सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. तर 26 सामन्यांत आयर्लंडचा पराभव झाला आहे.
पॉलने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीतील 163 सामन्यांमध्ये 3 हजार 895 धावा केल्या आहेत. पॉलने 25.9 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. तसेच पॉलने या दरम्यान 24 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे.