
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत.हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी ग्राउंड या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होत आहे. या स्पर्धेतील काही महत्त्वाच्या नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत. वर्ल्ड कप सराव सामन्यात पावसाने अनेकदा खोडा घातला. पावसामुळे काही सराव सामने रद्द करावे लागले. त्यामुळे या मुख्य स्पर्धेत पावसामुळे राखीव दिवसाच्या नियमाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसेच 2019 वनडे वर्ल्ड कप फायनल मॅचमधील सुपर ओव्हरही टाय झाली होती. त्यानंतर सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे सुपर ओव्हरवरुन वाद झाला होता. त्यामुळे आता यंदाच्या वर्ल्ड कपसाठी सुपर ओव्हरच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राखीव दिवस फक्त बाद फेरीतील म्हणजेच सेमी फायनल आणि फायनलसाठीच आहे. त्यामुळे 2 सेमी फायनल आणि फायनलमध्ये पावसाने हजेरी लावली तरच राखीव दिवसात खेळ जाईल. तर साखळी फेरीत पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना समसमान प्रत्येकी 1-1 असे पॉइंट दिले जातील. तसेच सुपर ओव्हरही टाय झाल्यास सर्वाधिक चौकारांच्या निकषांवर विजेता ठरवण्यात येणार नाही.
आता राखीव दिवसाबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. मुख्य दिवसातच सामना आटोपण्याचा प्रयत्न केला जाईल. 50 ओव्हरचा सामना कमीत कमी 20 ओव्हरचा खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही शक्यच न झाल्यास राखीव दिवशी सामना खेळवण्यात येईल. राखीव दिवसाच्या खेळाला तिथूनच सुरुवात होईल जिथे मुख्य दिवशी खेळ थांबला होता.
आता राखीव दिवशीही बाद फेरीतील (2 सेमी फायनल आणि 1 फायनल) सामन्यांचा निकाल लागला नाही तर विजेता कोण ठरणार, असाही प्रश्न आहे. आता यावरही आयसीसीने तोडगा काढलाय. सेमी फायनल सामना राखीव दिवसात न झाल्यास साखळी फेरीत दोघांपैकी अव्वल स्थानी असलेली टीम विजयी ठरेल. म्हणजेच ती टीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तसेच अंतिम सामना राखीव दिवसात न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता ठरवण्यात येईल.
दरम्यान सुपर ओव्हरमधूनच सामन्याचा निकाल लावला जाईल. जोवर सुपर ओव्हरचा निकाल लागत नाही, तोवर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. म्हणजे पहिली सुपर ओव्हर टाय झाली, तर दुसरी सुपर ओव्हर होईल. हाच क्रम जोवर निकाल लागत नाही, तोवर सुरु राहिल.