IND vs AUS: आम्हाला चेंडू निर्धाव घालवायचे नाहीत, ट्रेव्हिस हेडचं टीम इंडियाला खुलं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेत दोन्ही संघांचं पारडं जड आहे. पण ट्रेव्हिस हेडने भारतीय गोलंदाजांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे ट्रेव्हिस हेडविरुद्ध भारतीय गोलंदाज असा सामना पाहायला मिळणार आहे.

IND vs AUS: आम्हाला चेंडू निर्धाव घालवायचे नाहीत, ट्रेव्हिस हेडचं टीम इंडियाला खुलं आव्हान
IND vs AUS: आम्हाला चेंडू निर्धाव घालवायचे नाहीत, ट्रेव्हिस हेडचं टीम इंडियाला खुलं आव्हान
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 28, 2025 | 3:58 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या टी20 मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पहिलाच सामना कॅनबेरा येथे होणार आहे. पहिल्याच सामन्यात कोण बाजी मारतं? यावर मालिकेची आगेकूच ठरणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाकडून शा‍ब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याने भारतीय गोलंदाजांना खुलं आव्हान दिलं आहे. मालिकेत आक्रमकपण खेळणार असं स्पष्ट केलं आहे. ट्रेव्हिस हेडने सांगितलं की, ‘जर आम्हाला खेळायला मिळाले तर आम्ही कितीही धावा करू. मिचेल मार्श आणि मी पॉवरप्लेमध्ये मोकळेपणाने खेळण्याची योजना आखली आहे. ही आमच्या संघाची ताकद आहे. आम्ही एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्येही असेच करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बाहेरून दिसते तसे निष्काळजीपणे खेळत नाही, परंतु आम्ही शक्य तितक्या धावा करण्याचा प्रयत्न करू.’

ट्रेव्हिस हेडच्या या वक्तव्यानंतर ऑस्ट्रेलियाची आक्रमक रणनितीचा खुलासा होत आहे. पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांवर तुटून पडतील हे स्पष्ट दिसत आहे. ऑस्ट्रेलियाची मधली फळी एकदम मजबूत आहे. त्यामुळे सलामीला आलेल्या फलंदाजांना फार काही टेन्शन नाही असंच दिसत आहे. त्यामुळे ट्रेव्हिस हेडचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. मधल्या फळीत जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेविड आणि मार्कस स्टोयनिस आहे. मिचेल ओवह आणि मॅथ्यू शॉर्ट हे देखील आक्रमक खेळू शकतात. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना आता सावध पण अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे.

ट्रेव्हिस हेड म्हणाला की, ‘तुमच्या मागे इतक्या ताकदीची फलंदाज असतील. तर चेंडू निर्धाव सोडण्यात काहीच अर्थ नाही. आमच्याकडे स्टोयनिस, इंग्लिस,मॅक्सवेल, टिम डेव्हिड आहे. ही खूप मोठी ताकद आहे.’ ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त फलंदाजी केल्याचं या वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाची सरासरी 61 आहे. म्हणजेच पॉवरप्लेच्या प्रत्येक षटकात 10हून अधिक धावा करण्याची ताकद ऑस्ट्रेलियात आहे. दरम्यान, ट्रेव्हिस हेड काही फॉर्मात नाही. वनडे मालिकेतील तीन सामन्यात फक्त 65 धावा करता आल्या.