
बीसीसीआयने क्रिकेटप्रेमींना चकित करणारा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत. शुभमन गिल आधीपासून कसोटी संघाचा कर्णधार आहे, तसेच तो टी 20 संघाचा उपकर्णधारही आहे. आता तो वनडे संघांचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. यावेळी आगरकर यांना पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला कर्णधार बनवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना आगरकर म्हणाले की, ‘रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय आमच्यासाठी सोपा नव्हता. त्याने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली नसती, तरीही तो एक कठीण निर्णय असता. मात्र आम्हाला भविष्याचा विचार करावा लागत आहे. सध्या संघ कोणच्या स्थितीत आहे आणि संघाला काय हवे आहे ते पहावे लागते. 2027 च्या विश्वचषकापूर्वी आम्हाला कर्णधार बदलायचा होता, आमच्या सर्वांचा तोच दृष्टिकोन होता. त्यामुळे गिलकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.’
अजित आगरकर यांना रोहित शर्माच्या भविष्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ‘आम्ही अद्याप त्याच्याशी याबद्दल बोललेले नाही.’ त्यामुळे रोहित आणखी किती दिवस क्रिकेट खेणार हे येणार काळच ठरवणार आहे.
दरम्यान, भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे, या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यानंतर टी 20 मालिका रंगणार आहे.
शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.