
चेन्नई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्याच सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात टॉस गमावला. मात्र त्याचा टीम इंडियावर फारसा काही फरक पडला नाही. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपला कॅप्टन पॅट कमिन्स याचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर कुलदीप यादव याने आपल्याच बॉलिंगवर पहिली विकेट घेत कांगारुंना दुसरा झटका दिला. तर त्यानंतर रविंद्र जडेजा याने आपल्या दुसऱ्या होम ग्राउंडमध्ये कांगारुंच्या मिडल ऑर्डरचं कंबरंड मोडलं.
जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी संपवली. बुमराहने मिचेल मार्श याला झिरोवर आऊट केलं. विराट कोहली याने मार्शची स्लिपमध्ये कडक कॅच घेतली.त्यानंतर कुलदीप यादव याने डेव्हिड वॉर्नर याची आपल्याच बॉलिंगवर 41 धावांवर शिकार केली. कुलदीपने वॉर्नरला 41 रन्सवर कॉट एन्ड बोल्ड केलं. त्यानंतर रवींद्र जडेजा याने तांडव केला.
जडेजाने स्टीव्हन स्मिथ, मार्नस लबुशेन आणि एलेक्स कॅरी या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरला ढेर केलं. जडेजाने स्टीव्हन स्मिथ याला 46 धावांवर क्लिन बोल्ड केलं. जड्डूने टाकलेला बॉल कधी फिरला आणि बेल्स उडल्या हे स्टीव्हनलाही समजलं नाही. स्टीव्हन बोल्ड झाल्यानंतर एकटक पाहतच राहिला.
त्यानंतर जडेजाने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. जडेजाने कांगारुंच्या डावातील दुसऱ्या आणि चौथ्या बॉलवर मार्नस लबुशेन आणि एलेक्स कॅरी या दोघांना चालता केला. जडेजाने लबुशेन याला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती 27 धावांवर कॅच आऊट केलं. तर त्याच ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर एलेक्स कॅरी याला एलबीडब्ल्यू केलं. कॅरीला भोपळाही फोडता आला नाही.
दरम्यान एमए चिदंबरम स्टेडियम हे रवींद्र जडेजा याचं दुसरं होम ग्राउंड आहे. जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळतो. त्या चेन्नई टीमचं हे होम ग्राउंड आहे. जडेजाला या ग्राउंडवर खेळण्याचा दीर्घ अनुभव आहे. जड्डूने याच अनुभवाचा फायदा घेत कांगारुंच्या मिडल ऑर्डरला ढेर केलंय.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.