
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याला मोजून काही तासांचा अवधी बाकी आहे. हा सामना रविवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याने विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच रोहितने अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली. रोहितने टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करणार की नाही, तसेच आर अश्विन याच्या एन्ट्रीबाबतही उत्तर दिलं. रोहित नक्की काय म्हणाला याबाबत आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाचं अंतिम सामन्याआधी 17 नोव्हेंबर रोजी ऑप्शनल प्रॅक्टीस सेशन पार पडलं. या प्रॅक्टीस सेशनमध्ये आर अश्विन याने सहभाग घेतला. आर अश्विन याने बॉलिंगचा सराव केला. त्यामुळे आर अश्विन प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली. क्रिकेट चाहत्यांच्या मनात असलेला हाच नेमकाच प्रश्न पत्रकाराने रोहित शर्माला विचारला. यावर रोहितने दिलेलं उत्तर आपण जाणून घेऊयात.
“एकूण 15 खेळाडूंमधून कोणीही खेळू शकतं. सर्व पर्याय उपलब्ध आहेत. 12-13 खेळाडू निश्चित आहेत. त्यामुळे कुणाला खेळवायचं कुणाला नाही, हे नंतर ठरवू. आम्हाला खेळपट्टी कशी आहे, तसेच खेळाडूची कमी बाजू कोणती आहे, हे सर्व समजून घ्यावं लागेल”, असं उत्तर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिलं.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.