IND vs BAN: स्टार खेळाडू दुसरा कसोटी सामना खेळणार की नाही? कोचने म्हटलं….

India vs Bangladesh Kanpur Test: टीम इंडियाने चेन्नई कसोटीत बांगलादेशला पराभूत करुन 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून होणार आहे. त्याआधी अनुभवी खेळाडूच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs BAN: स्टार खेळाडू दुसरा कसोटी सामना खेळणार की नाही? कोचने म्हटलं....
ind vs ban test cricket
Image Credit source: bcci
| Updated on: Sep 25, 2024 | 8:17 PM

टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा शुक्रवार 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना हा 280 धावांनी जिंकला. त्यामुळे आता टीम इंडिया कानपूरमध्ये होणारा दुसरा सामना जिंकून बांगलादेशला क्लिन स्वीप करण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगालादेश दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. त्याआधी बांगालदेशचे हेड कोच चंडिका हाथुरुसिंघे यांनी अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. हाथुरुसिंघे यांनी शाकिब दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत काय म्हटलंय हे जाणून घेऊयात.

शाकिबला चेन्नईत टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. शाकिबला या दुखापतीनंतर फार बॉलिंग करता आली नाही. त्यामुळे शाकिब दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत चर्चा रंगली होती. मात्र आता हेड कोचने सर्वकाही सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. शाकिब दुसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचं हेड कोचने स्पष्ट केलं आहे.

शाकिबला बॅटिंग करताना जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर दुखापत झाली होती. त्यानंतर शाकिबला खबरदारी म्हणून बॉलिंगपासून शक्य तितक्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतरही शाकिबने या सामन्यात एकूण 21 ओव्हर बॉलिंग टाकली होती. शाकिब दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय हा कानपूरमधील सराव सत्रानंतर घेण्यात येणार असल्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे सदस्य हन्नान सरकार यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान शाकिबला पहिल्या सामन्यात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे शाकिबचा आता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करुन बांगलादेशला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. आता शाकिब भारतीय गोलंदाजांचा कशा सामना करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

शाकिब खेळणार की नाही?

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.