IND vs BAN 2ND TEST: भारताने 285 धावांवर डाव केला घोषित, 52 धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी सामना आता रंजक वळणावर आला आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पण चौथ्या दिवशी या सामन्याची रंगत वाढली आहे. बांगलादेशचा डाव 233 धावांवर आटोपला. त्या प्रत्युत्तरात भारताने 285 धावा करत डाव घोषित केला.

IND vs BAN 2ND TEST: भारताने 285 धावांवर डाव केला घोषित, 52 धावांची आघाडी
Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 30, 2024 | 5:38 PM

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न आहे. असं असताना चौथ्या दिवशी सामन्याचं रुपच पालटलं आहे. भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांवर रोखलं. तसेच या धावांचा पाठलाग करताना 9 गडी बाद 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी असून झटपट गडी बाद करण्यावर जोर असणार आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली खेळी केली. यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 72 धावा केल्या. तर केएल राहुलने 43 चेंडूत 68 धावा केल्या. विराट कोहलीचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. त्याने 35 चेंडूत 47 धावा केल्या. यावेळी त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकांत या 285 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या.

भारताचं लक्ष लीडपेक्षा षटकं आणि वेळेवर आहे. चौथ्या दिवशी डाव घोषित केल्यानंतरही 19 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पण ही 19 षटकं पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. पण पाचव्या दिवशी 98 षटकांचा खळ होणार आहे. त्यामुळे बांगलादेशला झटपट बाद करत विजयी धावा करण्यासाठी प्रयत्न असेल. चौथ्या दिवशीची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सामन्यात चित्र बदलू शकतं.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून बांगलादेशची स्थिती नाजूक आहे. बांगलादेशने 26 धावा करत 2 गडी गमावल्या आहेत. आर अश्विनने 5 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. भारताकडे अजूनही 26 धावांची आघाडी आहे. दरम्यान, सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.