
भारताने पहिला कसोटी सामना गमावल्याने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित चार सामन्यात कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. खरं तर पहिल्या सामन्यात टीम इंडिया विजयाला गवसणी घालेल अशी स्थिती होती. भारतीय फलंदाजांनी साजेशी कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीत भारताकडून पाच शतकं आली होती. यात दोन शतकं ही विकेटकीपर फलंदाज आणि टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याने मारली होती. पहिल्या डावात पंतने 134, तर दुसऱ्या डावात त्याने 118 धावांची खेळी केली होती. यासह कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकणारा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इतकं मोठं आव्हान देऊनही भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचं मन दुखावलं आहे. त्याने सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली असून आता ती व्हायरल होत आहे.
पराभवानंतर ऋषभ पंतने सोशल मीडियावर लिहिलं की, ‘याचं दु:ख थोड्या वेळासाठी असेल, पण आम्ही जोरदार कमबॅक करू.’ ऋषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएलच्या शेवटच्या साखळी फेरीतही त्याने शतक ठोकलं होतं. त्याचं क्रिकेटमधील हे सलग तिसरं शतक आहे. त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियापुढे कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.
It is going to sting us for a while but we BELIEVE in bouncing back stronger.#RP17 pic.twitter.com/IIhhDJQTn2
— Rishabh Pant (@RishabhPant17) June 24, 2025
दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला ऋषभ पंतच्या दोन शतकांबाबत विचारलं गेलं तेव्हा त्याने सांगितलं की, ‘तीन अजून शतकं झाली होती. ही सकारात्मक बाब आहे. धन्यवाद.’ इतकंच काय त्याने जसप्रीत बुमराहच्या पाच विकेटचाही उल्लेख केला. पण सर्वात शेवटी आम्ही सामना जिंकू शकलो नाहीत यावर येतं. ‘वैयक्तिक कामगिरी चांगली बाब आहे. आम्हाला आघाडीला असलेल्या सहा खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि तसं झालं. पण शेवटी आम्ही कसोटी जिंकू शकलो नाही. आता आम्ही यातून धडा घेऊन पुढे जाऊ.’