
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात धमाका केला आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारताने 7 फेब्रुवारीला वर्ल्ड कप मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएसएवर मात केली. भारताने वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यूएसएवर 29 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह स्पर्धेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाचा हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सलग नववा विजय ठरला.भारत यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सलग 9 सामने जिंकणारा संघ ठरला. त्यानंतर आता टीम इंडियाने नामिबिया विरूद्ध नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.
नामिबियाच्या कर्णधाराने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. अभिषेक शर्मा याच्या जागी आलेल्या ओपनर संजू सॅमसन याने भारताला स्फोटक सुरुवात करुन दिली. मात्र संजू चांगल्या सुरुवातीनंतर 22 रन्स करुन आऊट झाला.
संजूनंतर तिसऱ्या स्थानी तिलक वर्मा बॅटिंगसाठी आला. ओपनर इशान किशन याने तिलकसह भारताला वेगवान सुरुवात देत पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. इशानने पावरप्लेच्या सहाव्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 4 सिक्स आणि एका चौकारासह 28 धावा केल्या. इशानने यासह अवघ्या 20 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
इशानने या 20 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोर लगावले. तसेच इशाने 250 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. इशानचं हे या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. इशानच्या अर्धशतकासह भारताच्या पावरप्लेमध्ये 86 धावा झाल्या. टीम इंडियाची पावर प्लेमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच भारत या 10 व्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत पावरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला.
इशानने पावरप्लेनंतरही धमाका सुरुच ठेवला. इशानने सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स लगावला. तर इशानने पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. इशानच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 6.5 ओव्हरमध्ये अर्थात 41 बॉलमध्ये 100 रन्स केल्या. भारताने यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात घडवला. भारत टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात वेगवान 100 धावा करणारा पहिलाच संघ ठरला.