
टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला हिटमॅनही म्हणतात. रोहितला त्याच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी हिटमॅन असं नाव देण्यात आलंय. रोहितने आतापर्यंत भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.रोहित आयसीसी वनडे रँकिगमध्ये नंबर 1 बॅट्समन आहे. रोहितने नववर्षातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 26 धावा केल्या. मात्र रोहितने या 26 धावांच्या खेळीसह मोठा कारनामा केला. रोहितने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आणि त्याने तो हिटमॅन का आहे? हे सिद्ध करुन दाखवलं.
रोहितने न्यूझीलंड विरुद्ध 11 जानेवारीला बडोद्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना 26 धावा केल्या. रोहितने या खेळीत 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. रोहितने यासह ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. रोहित वनडे क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला.
रोहितने ख्रिस गेल याच्या तुलनेत कित्येक डावांआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. गेलने ओपनर म्हणून 274 डावांमध्ये 328 षटकार लगावले होते. तर रोहित शर्मा याने 191 डावांमध्येच 329 षटकार लगावत इतिहास घडवला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल याची दुसऱ्या स्थानी घसरण झालीय. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या हा यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जयसूर्याने 263 षटकार लगावले आहेत. तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील याने 174 षटकार लगावले आहेत. तर भारताचा माजी आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर 167 षटकारांसह या यादीत पाचव्या स्थानी आहे.
टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी 14 जानेवारीला होणार आहे. भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. अशात आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विजयी घोडदौड कायम राखते की न्यूझीलंड बरोबरी साधते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.