IND vs NZ : दुसरा दिवस न्यूझीलंडचाच, टीम इंडिया विरुद्ध 134 धावांची आघाडी

India vs New Zealand 1st Test Day 2 Highlights In Marathi: इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील आजचा दुसरा दिवस जरी असला तरी खेळाचा हा पहिलाच दिवस आहे, कारण पहिला दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला.

IND vs NZ : दुसरा दिवस न्यूझीलंडचाच, टीम इंडिया विरुद्ध 134 धावांची आघाडी
rachin ravindra and Daryl Mitchell ind vs nz
Image Credit source: blackcaps x account
| Updated on: Oct 17, 2024 | 6:45 PM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. दुसऱ्या दिवशी एकूण 81.2 ओव्हरमध्ये एकूण 13 विकेट्स गमावून 226 धावा झाल्या. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाने लाज घालवली. टीम इंडियाने मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या केली. टीम इंडियाला पहिल्या डावात फक्त 46 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने प्रत्युतरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड 134 धावांनी आघाडीवर आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

न्यूझीलंडने टीम इंडियाला 31.2 ओव्हरमध्ये 46 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाची हा तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर इतरांनीही निराशाच केली. ऋषभ पंत याने 20 आणि यशस्वी जयस्वालने 13 धावा केल्या. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या 5 जणांना खातंही उघडता आलं नाही.

कॅप्टन रोहित शर्मा आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 2 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर मोहम्मद सिराजने नाबाद 4 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. विलयम ओरुर्केने चौघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडची बॅटिंग

त्यानंतर न्यूझीलंडने आश्वासक सुरुवात केली. कॅप्टन टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनव्हे या दोघांनी 67 धावांची सलामी भागीदारी केली. लॅथम 15 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॉनव्हे आणि विल यंग या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. त्यानंतर यंग 73 बॉलमध्ये 33 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर काही षटकानंतर आर अश्विनने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. अश्विनने डेव्हॉन कॉनव्हे याला क्लिन बोल्ड करत शतकापासून रोखलं. कॉनव्हे नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. त्याचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. कॉनव्हेने 105 बॉलमध्ये 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 91 धावा केल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला

त्यानंतर रचीन रवींद्र आणि डॅरेल मिचेल या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत सावध खेळ करत एकही विकेट गमावली नाही. हीच जोडी नाबाद परतली. रचीनने 34 बॉलमध्ये 2 चौकारांसह 22 तर डॅरेलने 39 चेंडूत 1 चौकारासह 14 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाकडून आर अश्विन, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.