Virat Kohli : विराटच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, 2026 मधील दुसऱ्याच सामन्यात सेहवाग-पाँटिंगला पछाडण्याची संधी

Virat Kohli World Record : क्रिकेट विश्वात रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याने आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. विराटला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

Virat Kohli : विराटच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, 2026 मधील दुसऱ्याच सामन्यात सेहवाग-पाँटिंगला पछाडण्याची संधी
Virat Kohli Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 13, 2026 | 9:24 PM

भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली याने गेल्या अनेक एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा सपाटा कायम ठेवला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात धमाका केला. विराटने रविवारी 11 जानेवारीला बडोद्यात न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं. विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. विराटला शतक करण्याची संधी होती. विराटला 2026 मध्ये भारतासाठी वनडे आणि सोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय हा बहुमान मिळवण्याची संधी होती. मात्र विराटची ही संधी अवघ्या 7 धावांनी हुकली. विराट 93 धावांवर बाद झाला. त्यामुळे विराट वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढण्यापासून दूर राहिला. मात्र विराटकडे दुसऱ्या सामन्यात ती संधी आहे.

विराटच्या निशाण्यावर महाविक्रम

विराट पहिल्या वनडेत ज्या वेगाने खेळत होता ते पाहता त्याचं शतक सहज पूर्ण होईल असं वाटत होतं. मात्र विराट आऊट झाला. आता विराटला 14 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. विराटकडे भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे.

विराट वर्ल्ड रेकॉर्डसाठी सज्ज

विराटकडे सेहवाग आणि पाँटिंग या दोघांचा न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे. विराट, सेहवाग आणि पाँटिंग या तिघांच्या नावावर न्यूझीलंड विरुद्ध वनडेत प्रत्येकी 6-6 शतकं आहेत.  त्यामुळे आता विराटला दोघांना मागे टाकण्यासाठी फक्त 1 शतक करावं लागणार आहे. विराटकडे 1 शतकासाठी 2 सामने आहेत. विराट दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला तरी त्याला तिसऱ्या सामन्यात ही संधी आहे.

विराटचा झंझावत

विराटने न्यूझीलंडआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धमाका केला. विराटने त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2 सामन्यात अनुक्रमे 131 आणि 77 धावा केल्या. त्यानंतर विराटने 2026 मधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 93 धावांची खेळी केली. विराटने या 93 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. आता पहिल्या सामन्यात अधुरं राहिलेलं काम विराट कोहली दुसऱ्या किंवा तिसर्‍या सामन्यात पूर्ण करण्यात यशस्वी ठरतो का? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.