Team India : शतकानंतरही यशस्वी-ऋतुराजचा आगामी एकदिवसीय मालिकेतून पत्ता कट होणार? कारण काय?

Yashasvi Jaiswal and Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चाबूक कामगिरी केली. मात्र या दोघांना न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी संघात स्थान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होण्यामागील कारण काय जाणून घ्या.

Team India : शतकानंतरही यशस्वी-ऋतुराजचा आगामी एकदिवसीय मालिकेतून पत्ता कट होणार? कारण काय?
Yashasvi Jaiswal and Ruturaj Gaikwad
Image Credit source: Bcci
| Updated on: Dec 07, 2025 | 11:00 PM

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात पराभूत केलं. टीम इंडियाने 271 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. भारताचा हा या मालिकेतील दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताला मालिका जिंकून देण्यात रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या चौघांनी बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. या चौघांनीही या मालिकेत शतक झळकावलं. रोहित आणि विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशातही धावांचा तडाखा कायम ठेवला. तर यशस्वी आणि ऋतुराज या दोघांनी संधीचं सोनं केलं.

ऋतुराजने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलं. ऋतुराजचं हे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. तर यशस्वीने अंतिम सामन्यात शतक पूर्ण केलं. यशस्वीचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलं शतक ठरलं. यशस्वी यासह टेस्ट, टी 20i आणि वनडे या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा टीम इंडियाचा सहावा फलंदाज ठरला. यशस्वी आणि ऋतुराज या दोघांनीही या मालिकेत चमकदार कामागिरी केली. मात्र त्यानंतरही या दोघांना आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संघात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. या मागे कारणही तसंच आहे.

शुबमन-श्रेयसच्या कमबॅकनंतर यशस्वी-ऋतुराजला संधी मिळणार का?

टीम इंडियाचे फलंदाज शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांना दुखापत झाली आहे. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत कॅच घेताना दुखापत झाली. तर शुबमनला मायदेशात कोलकातात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली. त्यामुळे या दोघांना एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं. या दोघांच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना संधी देण्यात आली. त्यामुळे शुबमन आणि श्रेयस या दोघांच्या कमबॅकनंतर या दोघांना टीमसह प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल का? याबाबत आतापासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहे.

टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका कधी?

टीम इंडिया आता नववर्षात पहिलीवहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकूण 3 मॅचची वनडे सीरिज होणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघही महिन्याभराने भारतीय संघात कमबॅक करणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

वनडेनंतर टी 20i सीरिजचा थरार

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडेनंतर आता टी 20i सीरिजचा थरार रंगणार आहे. उभयसंघातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.