Team India : तारीख-टीम निश्चित, विराट कोहली-रोहित शर्मा आता पुन्हा केव्हा खेळणार? पाहा वेळापत्रक
Rohit Sharma and Virat Kohli : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेनंतर आता कोणत्या संघाविरुद्ध आणि कधी एकदिवसीय मालिका खेळणार? याची उत्सूकता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांना लागून आहे. जाणून घ्या टीम इंडियाच्या आगामी वनडे सीरिजचं वेळापत्रक.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सांगता झाली. टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारताने 271 धावांचं आव्हान हे सहजासहजी पूर्ण केलं. भारताने यासह ही मालिका 2-1 फरकाने जिंकली. टीम इंडियाला ही मालिका जिंकून देण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. विराटने 2 शतक आणि 1 अर्धशतकी खेळीसह एकूण 302 धावा केल्या. तर रोहितने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह उल्लेखनीय कामगिरी केली.
रोहित आणि विराट या दोघांनी टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. दोघेही आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. तसेच रोहित आणि विराट दोघेही त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे चाहत्यांना रोहित आणि विराट या मालिकेतनंतर खेळताना केव्हा दिसणार? याची कायम उत्सकूता असते. भारताची ही अनुभवी जोडी पुन्हा केव्हा खेळताना दिसणार? हे जाणून घेऊयात.
रोहित-विराटसाठी किती दिवसांची प्रतिक्षा?
चाहत्यांना रोहित आणि विराट या दोघांना पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र ही प्रतिक्षा महिन्यांची नसून काही आठवड्यांची आहे. टीम इंडिया आपल्या पुढील मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. ही मालिका मायदेशात होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जानेवारी 2026 मध्ये या मालिकेचा थरार रंगणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका
उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहेत. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी डिसेंबर महिन्यातील शेवटच्या किंवा जानेवारीतील पहिल्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 11 जानेवारी, बडोदा
दुसरा सामना, 14 जानेवारी, राजकोट
तिसरा सामना, 18 जानेवारी, इंदूर
रोको देशांतर्गत क्रिकेट खेळणार!
दरम्यान रोहित आणि विराट एकदिवसीय मालिकेआधी देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे आणि तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा थरार हा 24 डिसेंबर ते 18 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत दोघेही सहभागी होणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. विराट कोहली याने दिल्ली क्रिकेट बोर्डाला आपण या (VHT) स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. तसेच रोहितही खेळणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे.
