
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर फेरीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली. भारताने पाकिस्तानला 228 धावांनी पराभूत केलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. भारताने 50 षटकं खेळत दोन गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं. हे बलाढ्य आव्हान गाठताना पाकिस्तानी फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. फखर झमान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. यावरून पाकिस्तानी फलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं. तर नसीम शाह आणि हारिस रौफ दुखापतीमुळे मैदानात उतरलेच नाहीत. निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझम याने स्पष्टच आपलं मत मांडलं.
“पावसाचं काय आमच्या हातात नव्हतं. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आम्ही अपयशी ठरलो. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगल्या योजना आखल्या. तसंच झालं पण विराट आणि राहुलने त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी पहिली दहा षटकं चांगली टाकली. आमची फलंदाजी तितकी चांगली झाली नाही.”, असं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने सांगितलं.
भारताने पाकिस्तान समोर विजयासाठी 356 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावा करू शकला. टीम इंडियाने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. भारताकडून कुलदीप यादवने 5 गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुर याने प्रत्येकी एक गडी बाद केला.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.