IND vs PAK : भारताच्या सलग तिसऱ्या विजयाचा हा खेळाडू शिल्पकार, कॅप्टन सूर्याने कुणाचं नाव घेतलं?

Suryakumar Yadav Post Match IND vs PAK : भारताने पाकिस्तानवर एकतर्फी फरकाने मात करत विजयी हॅट्रिक पूर्ण केली. कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयानंतर आनंद व्यक्त केला.

IND vs PAK : भारताच्या सलग तिसऱ्या विजयाचा हा खेळाडू शिल्पकार, कॅप्टन सूर्याने कुणाचं नाव घेतलं?
Suryakumar Yadav Team India T20i Captain
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 16, 2026 | 2:41 AM

भारतीय क्रिकेट संघाने आपला दबदबा कायम राखत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 या मोहिमेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला. भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. इशान किशन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 175 धावा केल्या. इशानने 77 धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादव याने 32, शिवम दुबे 27 आणि तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तानला 114 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला.  भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? सूर्या काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

सूर्या टीम इंडियाच्या कामगिरीमुळे आनंदी

“हे भारतासाठी आहे. या खेळपट्टीवर पहिले बॅटिंग करणं हा सर्वोत्तम पर्याय होता. पहिल्या डावात बॅटिंग करताना विजयासाठी किती आव्हान द्यायचं सागणं अवघंड होतं. मात्र स्कोअरबोर्डवर 175 धावा लागल्यानंतर आम्ही 15-20 धावा जास्त केल्यात असं आम्हाला वाटलं. मात्र 155 धावा केल्या असत्या तर सामना अटीतटीचा झाला असता”, असं सूर्याने नमूद केलं.

सूर्याने विजयानंतर बोलताना आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला. ते तसेच खेळले जसं अपेक्षित होतं, असं सूर्याने सांगितलं.

“आम्ही तसंच खेळलो जसं आम्हाला अपेक्षित होतं. इशान किशन यानेही त्याच प्रकारे बॅटिंग केली (ज्याप्रकारे इशानने गेल्या काही सामन्यांत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केली). 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर कुणाला तरी जबाबदारी घ्यायची होती. इशानने जबाबदारी घेऊन चांगली कामगिरी केली”, असं म्हणत सूर्याने इशानच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.

सूर्याने इशान व्यतिरिक्त टीम इंडियाच्या तिघांचं नाव घेतलं. सूर्याने तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या तिघांच्या बॅटिंगचं कौतुक केलं. “ज्या पद्धतीने त्यांनी (तिलक, शिवम आणि रिंकु) बॅटिंग केली ते कौतुकास पात्र आहेत”, असं कर्णधार म्हणाला.

गोलंदाजांचाही उल्लेख

सूर्या फलंदाजांचं कौतुक करताना गोलंदाजांचं योगदान विसरला नाही. सूर्याने गोलंदाजांचा उल्लेख करत त्यांनाही श्रेय दिलं. “हार्दिक पंड्या याने नव्या चेंडूने धमाका केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह यानेही तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज का आहे दे दाखवून दिलं. विजयात सर्वांनी दिलेलं योगदान पाहून फार चांगलं वाटलं”, असं म्हणत सूर्याने संघाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला.