
भारतीय संघाच्या फलंदाजांनी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 डावात घोर निराशा केली. टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या कसोटीत 124 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरले. तर गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या शेपटीच्या फलंदाजांनी झुंजवलं. सेनुरन मुथुसामी याचं शतक आणि मार्को यान्सेन याने 93 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर टीम इंडियाला जेमतेम 200 पार मजल मारता आली. मार्को यान्सेन याने सर्वाधिक 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. मार्कोने 6 फलंदाजांना बाद केल्याने भारताचा डाव हा 201 धावांवर आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 288 धावांनी मोठी आघाडी मिळाली.
मार्को यान्सेन याने गुवाहाटीत आपल्या धारदार आणि भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय फलंदाजांना जेरीस आणलं. दक्षिण आफ्रिकेच्या या उंचपुऱ्या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांना चांगलंच झुंजवलं. मार्कोने 19.5 ओव्हरमध्ये 48 रन्स देत एकूण 6 विकेट्स घेतल्या. मार्कोने ध्रुव जुरेल, कॅप्टन ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या 6 फलंदाजांना आऊट केलं. विशेष म्हणजे मार्कोने 6 पैकी 5 विकेट्स या बाऊन्सरवर घेतल्या.
यान्सेनची कसोटी क्रिकेटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची ही चौथी तर टीम इंडिया विरुद्धची पहिलीच वेळ ठरली. मार्कोची भारतातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच मार्को दक्षिण आफ्रिकेसाठी भारतात 50 धावा आणि 5 विकेट्स घेणारा पहिलाच डावखुरा खेळाडू ठरला. क्रिकेट विश्वात फक्त 3 खेळाडूंनाच अशी कामगिरी करता आली आहे. इंग्लंडच्या जॉन लीवर याने 1976 साली अशी कामगिरी केली होती. जॉन अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्यानंतर 2000 साली निकी बोए याने असा कारनामा केला होता. तर आता 25 वर्षांनंतर मार्कोने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेने भारताला 201 धावांवर गुंडाळल्यानंतरही फॉलोऑन दिला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने बॅटिंग करण्याचं ठरवलं. दक्षिण आफ्रिकेला 288 धावांची आघाडी मिळाली. तर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह 314 धावांची आघाडी मिळवली आहे.