
प्रसिध कृष्णा आणि कुलदीप यादव या टीम इंडियाच्या जोडीने कमाल बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. विशाखापट्टणममध्ये आयोजित या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने रायन रिकेल्टन याला झिरोवर आऊट करत अप्रतिम सुरुवात केली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा या जोडीने शतकी भागीदारी केली. तर कॉकने मॅथ्यू ब्रिट्झके याच्यासह अर्धशतकी भागीदारी केली.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहज 300 पार पोहचण्याची संधी होती. मात्र कुलदीप आणि प्रसिध या दोघांनी उल्लेखनीय बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेचं 47.5 ओव्हरमध्ये 270 रन्सवर पॅकअप केलं. त्यामुळे आता टीम इंडिया 271 धावा करुन सामन्यासह मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाच्या बाजूने तब्बल 20 व्या एकदिवसीय सामन्यानंतर नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन केएल राहुल याने दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अर्शदीप सिंह याने रायन रिकेल्टन याला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला.
त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 121 बॉलमध्ये 113 रन्स जोडल्या. रवींद्र जडेजा याने ही सेट जोडी फोडली. जडेजाने बवुमाला 48 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर डी कॉक याने मॅथ्यू ब्रिट्झके यासह 54 रन्सची पार्टनरशीप केली. प्रसिध कृष्णा याने मॅथ्यूला 24 रन्सवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. प्रसिधने त्याच ओव्हरमध्ये (29) एडन मारक्रम याला 1 रनवर आऊट करत दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका दिला.
प्रसिधने दक्षिण आफ्रिकेला एका ओव्हरमध्ये 2 झटके देत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. मात्र क्विंटन डी कॉक याने एक बाजू लावून धरली होती. डी कॉकने शतक झळकावलं. मात्र त्याला शतकी खेळीत आणखी धावा जोडता आल्या नाहीत. प्रसिधने डी कॉकला बोल्ड केलं. डी कॉकने 89 बॉलमध्ये 106 रन्स केल्या.
त्यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरही खेळता आलं नाही.
डेवाल्ड ब्रेव्हीस याने 29, 17, कॉर्बिन बॉश 9, लुंगी एन्गिडी 1 आणि ओटनील बार्टमॅन याने 3 रन्स केल्या. तर केशव महाराज याने नाबाद 20 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियासाठी प्रसिध कृष्णा आणि कुलदीप या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत प्रसिध-कुलदीपला चांगली साथ दिली.