
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी यजमान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. भारताने 29 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील सामन्यात 5 विकेट्सन धुव्वा उडवला. तर त्याआधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभवाची धुळ चारत फायनलमध्ये धडक दिली. दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरीत पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे या संघामध्ये अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. हरमनप्रीत कॅप्टन म्हणून पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला फायनलमध्ये पोहचवण्यात यशस्वी ठरली. तर लॉरा वोल्वार्ड्ट दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहचवणारी पहिली कर्णधार ठरलीय. त्यामुळे लॉरा आणखी एक विजय मिळवून देणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना रविवारी 2 नोव्हेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान भारतीय महिला संघाला आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. मात्र आता भारताकडे सुवर्णसंधी आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशात होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळवून भारतीय चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.