गॉल कसोटीतील दुसऱ्या डावात श्रीलंकेने फलंदाज बदलला, 371 धावांचा पाठलाग करताना मिळाली एन्ट्री
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या विजयी धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन संघात एक बदल झाला आहे.

Pasindu Sooriyabandara replace Dinesh Chandimal: गॉल कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली होती. या धावांच्या पुढे खेळताना भारताचा डाव 193 धावांवर आटोपला आणि श्रीलंकेपुढे विजयासाठी 371 धावांचं आव्हान आलं. हे आव्हान श्रीलंकेसाठी काही सोपं नाही. त्यात श्रीलंकेला या विजयी धावांचा पाठलाग करताना एक धक्का बसला. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चांडीमल गॉल कसोटीच्या दुसऱ्या डावाला मुकला आहे. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीवेळी क्षेत्ररक्षण करताना दिनेश चांडीमलला दुखापत झाली. चौकार अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे चांडिमलची कन्कशन टेस्ट फेल गेल्याने त्याला आता गॉलमध्ये फलंदाजी करता येणार नाही. त्याच्या जागी आता पासिंदु सूरियाबंदारा फलंदाजीला येणार आहे.
कोण आहे पासिंदु सूरियाबंदारा?
दिनेश चांडीमल या सामन्यातील दुसऱ्या डावाला मुकल्यानंतर पासिंदु सूरियाबंदारा याला संधी मिळाली आहे. त्यामुळे चांडीमलची जागा भरून निघाल्याने दिलासा मिळाला आहे. पासिंदु सूरियाबंदारा हा देखील चांगला फलंदाज आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजाने 68 फर्स्ट क्लास सामन्यात 54.36 च्या सरासरीने 4893 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर त्याच्या नावावर 14 शतकं आहेत. दुसरीकडे, पासिंदु सूरियाबंदराला याला क्रिकेटचं बाळकडू घरातूनच मिळालं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्याचं पूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलं गेलं आहे. त्याचा मोठा भाऊ उमेश सूरियाबंदरा क्रिकेटपटू होता. त्याचे आजोबा क्रिकेटपटू होते. तर वडिल माजी बॉस्केटबॉलपटू राहिले आहेत.
गॉलमध्ये श्रीलंकेसाठी विजय कठीण
गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 371 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान काही सोपं नाही. कारण चौथ्या डावात इतक्या धावांचा पाठलाग करणं कठीण आहे. आजवरच्या आकडेवारीतून हेच दिसून आलं आहे. खेळपट्टीही फिरकीला पूरक आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी करून इतक्या धावा करणं सोपं नाही. त्यामुळे श्रीलंकेला बचावात्मक खेळण्याशिवाय पर्याय नाही.