IND vs SL : भारताविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेने संघ केला जाहीर, 16 खेळाडूंबाबत जाणून घ्या

India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून दोन्ही संघ भविष्याचा वेध घेणार आहेत. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून पायाभरणी सुरु होणार आहे. टीम इंडियानंतर श्रीलंकेने टी20 संघ जाहीर केला आहे.

IND vs SL : भारताविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेने संघ केला जाहीर, 16 खेळाडूंबाबत जाणून घ्या
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 23, 2024 | 2:08 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाने कात टाकली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे नव्या संघाची बांधणी आतापासूनच सुरु झाली आहे. टीम इंडियाचं प्रशिक्षकपद गौतम गंभीरच्या हाती आल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे हा दौरा खास असणार आहे. 2026 टी20 वर्ल्डकपचा विचार करता संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे त्याचाही या मालिकेत कस लागणार आहे. असं असताना श्रीलंकन संघही संक्रमण अवस्थेत आहे. प्रशिक्षकपदाची तात्पुरती धुरा सनथ जयसूर्याच्या खांद्यावर दिली आहे. तर भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय टी20 संघ जाहीर करण्यात आला आहे. वानिंदू हसरंगा याने टी20 वर्ल्डकपमधील पराभवानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता नेतृत्व कोणाच्या हाती सोपवलं जाणार याची उत्सुकता होती. अखेर चरित असलंकाला ही जबाबदारी सोपवली असून त्याच्या नेतृत्वात श्रीलंकन संघ टी20 मालिका खेळणार आहे.

लंका प्रीमियर लीगमध्ये चरित असलंकाने जाफना किंग्सचं नेतृत्व केलं होतं. अंतिम सामन्यात जाफना किंग्सने गॅले मार्व्हल्सचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे यशाची चव चाखलेल्या चरित असलंकाला संघाची धुरा सोपवली आहे. भारताविरूद्धच्या मालिकेपासून चरित असलंका कर्णधारपदाच्या नव्या इनिंगला सुरुवात करेल. दुसरीकडे, अँजेलो मॅथ्यूजला श्रीलंका टी20 संघातून वगळण्यात आलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याला कायमचा बसवण्याचा निर्णय घेतला आहे असंच दिसत आहे. दुसरीकडे, 34 वर्षीय दिनेश चंडिमलला संघात स्थान दिलं आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संघात स्थान दिलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होईल. पहिला सामना 27 जुलैला, दुसरा सामना 28 जुलैला आणि तिसरा सामना 30 जुलैला होईल. हे तिन्ही सामने पल्लेकेले मैदानात होणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

श्रीलंकेचा टी20 संघ : चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,महिष थिक्षाणा,चमिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुनिथ वेल्लालगे, दुष्मांथा चमिरा, बिनुरा फर्नांडो.

भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.