IND vs SL : शफालीचा तडाखा, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा, भारताचा विजयी हॅटट्रिकसह मालिका विजय

India vs Sri Lanka Women 3rd T20I Match Result : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I मालिकेत विजयी घोडदौड कायम राखत सलग तिसरा सामना जिंकला आणि मालिकेवर आपलं नाव कोरलं आहे. शफाली ही भारताच्या विजयाची नायिका ठरली.

IND vs SL :  शफालीचा तडाखा, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा, भारताचा विजयी हॅटट्रिकसह मालिका विजय
Shafali Verma Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Dec 26, 2025 | 10:06 PM

टीम इंडियाने ओपनर आणि लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर सलग तिसरा टी 20I सामना जिंकत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. भारताने श्रीलंकेवर तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तिसर्‍या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने भारतासमोर 113 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान शफालीच्या खेळीच्या मदतीने सहज पूर्ण केलं. भारताने 13.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 115 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 5 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. भारताने या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी मिळवली आहे.

टीम इंडियाचा मालिका विजय

शफाली वर्मा ही भारताच्या विजयाची नायिका ठरली. शफाली व्यतिरिक्त कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने या विजयात योगदान दिलं. मात्र दुसऱ्या बाजूला माफक आव्हान असूनही जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मंधाना या दोघी फटकेबाजी करण्यात अपयशी ठरल्या. भारताने स्मृती आणि जेमिमाह या दोघींच्या रुपात आपल्या 2 विकेट्स गमावल्या. तर शफाली आणि हरमनप्रीत या दोघी भारताला विजयी करुन नाबाद परतल्या.

टीम इंडियाची बॅटिंग

शफाली आणि स्मृती या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 27 धावा जोडल्या. त्यानंतर स्मृती अवघी 1 धाव करुन आऊट झाली. स्मृतीनंतर जेमिमाह मैदानात आली. जेमी आणि शफाली या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी झाली. जेमी 15 बॉलमध्ये 9 रन्स करुन आऊट झाली. जेमीनंतर कॅप्टन हरमन मैदानात आली.

शफाली आणि हरमन या दोघींनी 32 चेंडूत नाबाद 48 धावांची भागीदारी केली आणि भारताला विजयी केलं. हरमनने 18 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा केल्या. तर शफालीने 42 बॉलमध्ये 188.10 च्या स्ट्राईक रेटने 79 रन्स केल्या. शफालीने खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केली. शफालीच्या या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. तर श्रीलंकेसाठी कविषा दिलहारी हीने दोन्ही विकेट्स मिळवल्या.

शफालीचा विजयी फटका

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेला भारताने टॉस जिंकून बॅटिंगसाठी बोलावलं. मात्र श्रीलंका पहिल्या 2 सामन्यांप्रमाणे या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. श्रीलंकेसाठी इमेषा दुलानी हीने सर्वाधिक 27 धावा केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 112 धावापर्यंत पोहचता आलं. भारतासाठी रेणुका सिंह हीने 4 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा हीने श्रीलंकेच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.