
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात मालिकेचा निकाल लागणार आहे. सामना ड्रॉ किंवा इंग्लंडने जिंकला तर मालिका त्याच्या खिशात जाईल. पण भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. तसेच वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेतही भारताला जबर फायदा होत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. असं असताना इंग्लंडने ओव्हल कसोटीसाठी संघात तीन बदल केले आहेत. या कसोटी सामन्यात कर्णधार बेन स्टोक्स खेळणार नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा ओली पोपच्या खांद्यावर दिली आहेत. तसेच जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे देखील प्लेइंग 11 मधून बाहेर आहेत. या तीन दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडियाला फायदा होईल असं वाटत होतं. पण तसं काही नसून उलट आणखी सतर्क राहावं लागणार आहे. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चरसारखे दिग्गज खेळाडू नसले तरी या मागचं दुसरं गणित समजून घेणं आवश्यक आहे.
ओव्हल कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. यात एक फिरकीपटूचा समावेश केला आहे. इंग्लंडने प्लेइंग 11 मध्ये ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओव्हर्टन आणि जॉश टंग यांना संधी दिली आहे. हे चारही वेगवान गोलंदाज आहेत. यात तीन गोलंदाज चेंडू स्विंग करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे इंग्लंडची रणनिती पाहून भारतीय संघाची चिंता वाढळी आहे. इंग्लंडने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिल्याने ही खेळपट्टी स्विंगला मदत करणारी असू शकते. त्यामुळे भारताला रणनितीत बदल करावा लागणार आहे. कारण आतापर्यंत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम मानली जात होती. पण इंग्लंडची प्लेइंग 11 पाहून गाफील राहण्यात अर्थ नाही.
22 यार्डच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळेल असं दिसत आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करणं कठीण जाईल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर सर्व काही अवलंबून असणार आहे. चेंडू स्विंग झाला तर सिराज आणि आकाश दीपला मदत मिळेल. अर्शदीपला संधी मिळाली तर गोलंदाजीत आणखी ताकद वाढेल. दुसरीकडे, बुमराह खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नहाी. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला सावध पावलं टाकावी लागणार आहेत.
इंग्लंडची प्लेइंग 11 : जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग.